Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुंबई उच्चनायालयात ५६ पानांचे प्रतिज्ञापत्र

Spread the love

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात ईडीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. वसुलीतून जमा केलेले पैसे देशमुख यांनी बोगस कंपन्यांद्वारे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. तर भ्रष्टाचाराच्या पैशांचा स्रोत याबाबत देशमुखांनी असमाधानकारक उत्तरे दिली आहेत. या प्रकरणाचे ईडीचे तपास अधिकारी तासिन सुलतान यांच्या पथकाने ५६ पानांचे हे प्रतिज्ञापत्रक मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.

विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रात देशमुखांचा अधिकाऱ्याच्या बदली प्रकरणातही थेट संबध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत. यामुळे देशमुखांची सुटका झाल्यास ते राजकिय वजन वापरून पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असाही अंदाज ईडीने वर्तवला आहे. तसेच देशमुख हे तपासाही सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ईडीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच मनी लाँड्रिंगच्या कटाचे सूत्रधार होते आणि त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला होता. देशमुख यांनी मनमानी बदल्या आणि पोस्टिंगसाठी पोलिस अधिकार्‍यांवर अवाजवी प्रभाव टाकल्याचा आरोपही एजन्सीने केला आहे. देशमुख यांच्या जामीन याचिकेला उत्तर म्हणून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने या गोष्टी सांगितल्या आहेत.

देशमुख यांची याचिका फेटाळण्याची मागणी

ईडीचे सहायक संचालक तसीन सुलतान यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांची याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. देशमुख हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव टाकू शकतात, असेही बोलले जात आहे. अर्जदार (देशमुख) आणि त्याचा मुलगा हृषिकेश देशमुख, सचिन वाजे (बडतर्फ पोलीस अधिकारी), संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे (देशमुख यांचा माजी सहकारी) हे या संपूर्ण कटाचे सूत्रधार असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून पैसे गोळा करण्याच्या संपूर्ण कटामागे देशमुख हा मुख्य सूत्रधार आणि मेंदू असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती आणि सध्या ते ११ एप्रिलपर्यंत सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी जामीन मागितला होता आणि ईडीचा खटला खोटा असल्याचे म्हटले होते. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!