Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMPanjabTourUpdate : पंतप्रधान मोदींना आपला पंजाब दौरा का करावा लागला रद्द ?

Spread the love

नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यावर पक्षाच्या प्रचारार्थ निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आंदोलकांनी मध्येच अडवल्याने मोदींना १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावरच थांबावे लागले आणि आपला दौरा रद्द करीत परत फिरावे लागले. या घटनेमुळे भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील कर्मचाऱ्यांना “तुमच्या मुख्यमंत्र्यांचे मी जिवंत पोहोचलो यासाठी आभार सांगा…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.


याबाबत एएनआयने या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर पोहोचताच तेथील कर्मचाऱ्यांना म्हणाले की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता. याबाबत डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती.

याबाबत गृह मंत्रालयाने म्हटले आहे कि , पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!