Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे कारवाईची मागणी

Spread the love

मुबई : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , जे काही अघटीत घडले आहे, त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे.”

दरम्यान नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे,” असे  उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत. हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!