CoronaIndiaUpdate : ओमिक्रॉन व्हेरिएंट विरोधात लढा देण्यासाठी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची तयारी , अदर पुनावाला यांनी दिली हि माहिती…

नवी दिल्ली : कोरोनाची भीती आणि चर्चा आताशी कुठे थांबत नाही , तोच नव्याने चर्चेत आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. यावर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी येत्या काही आठवड्यांत सर्वांसाठीच आनंदाची बातमी देण्याचे संकेत दिले असल्याचे वृत्त आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अदर पुनावाला यांनी म्हटले आहे कि , ओमिक्रॉनचा प्रतिकार करण्यात कोव्हिशील्ड लस किती प्रभावकारी ठरू शकते, हे येत्या दोन ते तीन आठवड्यात स्पष्ट होईल. ओमिक्रॉन अधिक घातक आहे की नाही, हे आताच सांगता येणार नाही. त्यात बूस्टर डोस हा आपल्यापुढे पर्याय आहे. असं असलं तरी सरकारचा पहिला फोकस हा सर्वांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस देण्यावर आणि लसीकरण पूर्ण करण्यावरच असला पाहिजे.
६०० रुपयापर्यंत असेल किंमत
दरम्यान कोव्हिशील्ड किती प्रमाणात ओमिक्रॉनचा प्रतिकार करू शकते याचा अभ्यास सुरू असल्याने त्यासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. ऑक्सफोर्डचे शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करत आहेत. ते निष्कार्षापर्यंत पोहचल्यावर आम्ही नवीन लसची निर्मिती करू शकतो. येणाऱ्या सहा महिन्यांत ही लस बूस्टर डोससाठी उपलब्ध करता येऊ शकते, असे पूनावाला यांनी नमूद केले. मात्र काळानुरूप कोव्हिशील्डची प्रतिकारक क्षमता कमी होईल, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला तर लसचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा डोस दिला जाऊ शकतो. ही लस ६०० रुपयांपर्यंत मिळू शकते, असेही पूनावाला यांनी सांगितले.
येत आहे आणखी एक लस
लोकांच्या गरजेनुसार कंपनीकडे मुबलक माणात लसींचा मोठा साठा उपलब्ध असून राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आम्ही २५ कोटी डोस राखून ठेवले आहेत. अशावेळी सरकारने बूस्टर डोस देण्याची घोषणा केल्यास आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असे नमूद करताना कोव्होव्हॅक्सबाबत महत्त्वाचे अपडेट्स पूनावाला यांनी दिले. कोव्होव्हॅक्स या लसीचाही भरपूर साठा आमच्याकडे आहे. कोविडवरील ही स्वदेशी लस आहे. पुढील काही आठवड्यांत या लसीच्या वापराला परवानगी मिळणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होईल, असे पूनावाला म्हणाले. दरम्यान कोव्हिशील्डच्या किमतीत कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.