MaharashtraRainUpdate : राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा , मंगळवारी १२ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

पुणे : पुढील ४८ तासात उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील चार दिवस काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आज उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यांत विजांचा कडकडाट जास्त होणार आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर. TC pic.twitter.com/eKoxbVul0r— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2021
दरम्यान पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात मान्सून सक्रिय असून उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हा अंदाज लक्षात घेऊन उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारी १२ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
त्याचबरोबर मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. मागील जवळपास एक महिन्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात असे इशारे देण्यात आले आहेत. मंगळवारी राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर अशा एकूण १२ जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.