VidarbhaNewsUpdate : अरे , रे !! जनरेटरचा वापर करणे बेतले जीवावर , एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू !!

चंद्रपूर : वीज गेल्यानंतर जनरेटरचा वापर करणे येथील एका कुटुंबियांच्या जीवावर बेतले आहे. या घटनेत चंद्रपुरातील दुर्गापूर भागात जनरेटरच्या धुरात गुदमरुन तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून कुटुंबातील ७ पैकी ६जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये लहान मुलांसह नव दाम्पत्याचाही समावेश आहे.
रमेश लष्करे- ४४, अजय लष्करे-२० लखन लष्करे ९, कृष्णा लष्करे ८, माधुरी लष्करे १८, पूजा लष्करे १४ अशी मृतांची नावे आहेत. दासू लष्करे ४० हा एकमेव सदस्य बचावला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मधील ही घटना असून मयत सर्व मजूर वर्गातील सदस्य आहेत.रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणले गेले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील मोठा मुलगा अजय लष्करे याचे २८ जून रोजी माधुरीशी लग्न झाले होते. हे नव दाम्पत्य काल रात्री देवदर्शनानंतर घरी पोहोचले होते त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. दरम्यान रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. मात्र जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. घरातच रात्रभर जनरेटर सुरु होता. त्यामुळे रात्रभर धुराचे लोळ घरातच घुटमळत होते. घर पूर्णतः बंद असल्यामुळे धूर बाहेर जायला वाव नव्हता. त्यामुळे झोपेत असलेल्या लष्करे कुटुंबांचा श्वास केंव्हा गुदमरला हे कोणालाही समजले नाही.
शेजारच्यांमुळे उघडकीस आली घटना
दरम्यान लगीन घरात काहीच हालचाल दिसत नसल्यामुळे सकाळी शेजारच्या लोकांना शंका आली. आधी त्यांनी दार ठोठावलं. त्यावेळी त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंकेचं रुपांतर संशयात झालं आणि जे नको होतं तेच झालं. लष्करे कुटुंबातील ६ लोकांचे मृतदेह लगीनघरात पडले होते.