Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanUpdate : सरकारकडून चर्चेचे निमंत्रण पण एकटा जाणार नाही : खा. छत्रपती संभाजीराजे

Spread the love

कोल्हापूर : ‘राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ’, असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


पावसाच्या हजेरीत खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला.’आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसे कुणी बोलले नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारे उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे’ असे संभाजीराजे म्हणाले.

अजित पवारांचा फोन आला होता…

अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला ४ जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटले सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.
आंदोलनाचा इशारा देऊन नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचे स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया’ असंही संभाजीराजे म्हणाले.

…तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही

लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला ३६ जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू’ असंही राजे म्हणाले.

यांची होती उपस्थिती

खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आवाहन केल्याप्रमाणे याआंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील सर्व आमदारांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपस्थित लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे सांगून पुढच्या काळामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला सहभाग राहील अशी ग्वाही दिली.

भरपावसात आंदोलन, राजघराण्यातील महिलांचाही सहभाग

मराठा समाजाचे हे मूक आंदोलन सुरू असताना पावसाचा जोर अधिकच वाढला तरी डोक्यावर छत्र्या न घेता भरपावसामध्ये आंदोलक आणि या आंदोलनाला पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात पहिल्यांदाच शाहू राजेंच्या राजघराण्यातील सर्वच सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांचाही सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!