Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaSportsUpdate : कोरोनाच्या दणक्याने यंदाची आयपीएल रद्द

Spread the love

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी आयपीएल स्पर्धा स्थगित करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

देशात कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या आयोजनावरही गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते . तसेच आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू बायो-बबलमध्ये असूनही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परदेशी खेळाडूंमध्ये अस्वस्थता होती. याच पार्श्वभूमीवर परदेशी खेळाडूंमध्ये आयपीएलचे पुढील सामने खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर आज आणखी दोन संघांचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून याआधीच भारतीय प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत प्रवास बंदी लागू केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये समाविष्ट असलेल्या ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांची मायदेशी परतण्याची व्यवस्था बीसीसीआय कशी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने याआधीच सर्व खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!