Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLockDownUpdate : Break The Chain अंतर्गत जाणून घ्या काय आहेत सुधारित आदेश ?

Spread the love

औरंगाबाद :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी Break The Chain अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. दि 16 एप्रिल रोजीच्या मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील. सदरील आदेश 22 एप्रिल रोजी रात्री 8.00 वाजेपासून 1 मे रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेत. या आदेशातील खालील नमूद सर्व बाबी हया संपूर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासाठी) लागू राहतील.

कार्यालयीन उपस्थिती 

• राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबधीत सर्व शासकीय कार्यालये फक्त 15% अधिकारी/कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. तथापि, कोविड-19 संबधीत अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात येत आहे.

•इतर शासकीय कार्यालयाच्या बाबतीत अधिक उपस्थितीकरिता संबधित कार्यालय प्रमुख यांनी स्थानिक आपत्ती प्राधिकरणाची परवानगी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

•राज्य शासनाकडील `Break The Chain’ अंतर्गत निर्गमित दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 5 मध्ये नमूद असलेली इतर कार्यालये (अत्यावश्यक सेवेत नसलेले) 15% कर्मचारी किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल त्या क्षमतेने कार्यरत राहतील.

•राज्य शासनाकडील `Break The Chain’ अंतर्गत निर्गमित दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 2 मध्ये नमूद असलेली अत्यावश्यक सेवेतील कार्यालये कमीत कमी कर्मचारी किंवा 50% कर्मचारी या मर्यादेत सुरु राहतील.  प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा पुरविणा-या कर्मचा-यांची संख्या आवश्यकतेनुसार 100% पर्यंत कार्यालय प्रमुखाद्वारे व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वाढविली जाऊ शकेल.

दोन तासात आटपा विवाह सोहळा

•विवाह समारंभ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत फक्त एकाच हॉलमध्ये 2 तासामध्येच पूर्ण करावे लागतील. या नियमांचे भंग करणा-या कोणत्याही कुटुंबाला, हॉल मालक/चालकास व इतर संबधितास रु.50,000/- इतका दंड आकारण्यात येईल.  तसेच, असे समारंभ ज्या हॉलमध्ये होत असतील त्या जागेवर कोविड-19 संबंधीची अधिसूचना लागू असेपर्यंत बंदी घेण्यात येईल.

खाजगी प्रवासी वाहतूक

अ) खाजगी प्रवासी वाहतूक (बसेस वगळता) फक्त अत्यावश्यक सेवा व वैध कारणांसाठीच केवळ वाहनचालक व 50% प्रवासी क्षमतेने सुरु राहतील.  तथापि, सदर वाहतूक आंतरजिल्हा किंवा जिल्हयाअंतर्गत होणे अपेक्षित नसून शहरापुरतीच मर्यादित असणे अपेक्षित आहे.  आंतरजिल्हा किंवा जिल्हयाअंतर्गत प्रवास केवळ अत्यावश्यक सेवा किंवा वैदयकीय निकडीचे कारण तसेच, अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच करता येईल.  सदर नियमांचे भंग करणा-यावर रु.10,000/- इतका दंड आकारण्यात येईल.

ब) खाजगी बसेसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या 50% प्रवाश्यांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल.

क) खाजगी बसेस आंतरजिल्हा किंवा जिल्हयाअंतर्गत प्रवासाकरिता खालील बंधने पाळण्यात यावीत:-

•खाजगी बसेस वाहतुकदारांना शहरात जास्तीत जास्त 2 थांबे घेता येतील.  सदर थांब्यांची माहीती प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद यांना दयावी.

·       खाजगी बसेसद्वारा प्रवास करणारा प्रवासी शेवटच्या ठिकाणी उतरताच, प्रवाश्याच्या हातावर 14 दिवस गृहविलगीकरणाचा (Home Quarantine) शिक्का मारण्यात यावा. सदर शिक्का खाजगी बसेस वाहतुकदार यांनी स्वत: बनवून घ्यावे.
·       सर्व प्रवाश्यांचे प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनींग (Thermal Screening) करण्यात यावे.  या दरम्यान एखादया प्रवाशास लक्षणे आढळल्यास, त्यास तात्काळ कोविड केअर सेंटर (CCC) किंवा रुग्णालयामध्ये पाठविण्यात यावे.
·       खाजगी बसेसद्वारा प्रवास करुन येणा-या प्रवाश्यांनी तात्काळ स्वत:ची तपासणी करुन घेण्याबाबत खाजगी बसेस वाहतुकदार यांनी प्रवाश्यांच्या निदर्शनास आणून दयावे.
·       उपरोक्त नियमांचे प्रथमत: भंग करणा-या खाजगी बस वाहतुकदार यांचेवर रु.10,000/- इतका दंड आकारण्यात येईल.  वारंवार नियमांचे भंग होत असल्यास, सदर खाजगी बस वाहतुकदार यांचा परवाना कोविड-19 संबधीची अधिसूचना लागू असे पर्यंत रद्द करण्यात येईल.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक

•राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अथवा स्थानिक महानगरपालिकेच्या बसेस (City Buses) या 50% क्षमतेने चालविण्यात याव्यात, कोणत्याही  परिस्थितीत उभ्याने प्रवास करता येणार नाही.

• शहराअंतर्गत‍ अथवा जिल्हयाअंतर्गत बसेस करिता खालील अटी व शर्ती राहतील.

अ) राज्य परिवहन कार्यालयाने (MSRTC) प्रवाश्यांची माहिती स्थानिक प्रशासन/प्राधिकरणास दयावी. सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करावे.
ब) प्रवासाच्या अंतिम थांब्यावर प्रवाशी व्यक्तीच्या हातावर 14 दिवसांचा विलगीकरण (Home Quarantine) शिक्का मारावा लागेल. थर्मल स्क्रिनींगमध्ये प्रवाशी आजारी आढळून आल्यास त्यास कोवीड केअर सेंटर (CCC) किंवा रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
क) स्थानिक प्राधिकरण प्रवाश्यांची RAT (Rapid Antigen Test) ही तपासणी नेमून दिलेल्या प्रयोगशाळेत करतील मात्र त्याकरिता येणारा खर्च हा प्रवाशास करावा लागेल.
ङ) प्रवाशाच्या हातावर विलगीकरण (Home Quarantine) शिक्का मारण्यापासून सूट देण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन/तपासणी पथकातील वैदयकीय अधिकारी त्यांच्या पातळीवर घेईल.
इ) सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कमल 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!