Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : महात्मा फुले ते भीम जयंती निमित्त लसीकरण महोत्सवाची पंतप्रधानांची घोषणा

Spread the love

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; कोरोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशाजवळ पूर्वीपेक्षा अधिक संसाधने असून, आता ‘मायक्रो- कंटेनमेंट झोन्स’वर लक्ष केंद्रित करायला हवे यावर त्यांनी भर दिला. कोरोना महासाथीला आळा घालण्यासाठी ‘चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा’ या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला. जनतेच्या सहभागासह आपले कठोर परिश्रम करणारे डॉक्टर्र्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळण्यात फार मोठा हातभार लावला असून अजूनही लावत आहेत, असे ते म्हणाले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

दरम्यान या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वयाने काम करावे त्यातूनच करोनावर मात करणे शक्य आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!