MarathwadaNewsUpdate : Sad News : चिमुकल्या बहीण -भावासह मामाचाही नदीच्या परवाहात बुडून मृत्यू

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील वाण नदीत बहीण-भावासह मामा अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवम सुरेश मुळे (वय-८), शिवकन्या सुरेश मुळे( वय-१५) आणि सचिन संभाजी बोडके (वय-२० अशी मृतांची नावं आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. आपली दोन्ही चिमुकले पाण्यात बुडाल्याचं समजताच शिवम आणि शिवकन्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तर एकाच कुटुंबातील तिघांचा नदीपात्रात बुडून करून अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर सोनपेठ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवम आणि शिवकन्या हे दोघे भाऊ-बहीण वाण नदी परिसरात खेळण्यासाठी गेले होते. मात्र, नदीला पूर असल्यामुळे दोघे पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी मामा सचिन बोडके यानं पाण्यात उडी घेतली. मात्र, त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शिवम आणि शिवकन्या हे आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. नदीपात्रामध्ये खेळत असताना अचानक हे दोघेही पाण्यामध्ये बुडू लागले. थोड्या अंतरावर असलेल्या मामा सचिन याच्या लक्षात येताच त्याने आपल्या भाचा-भाचीला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. परंतु पोहता येत नसल्यानं त्याचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने, निमगाव मध्ये शोककळा पसरली आहे.