Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : NEET आणि JEE परीक्षांच्या विरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन

Spread the love

देशात होत असलेल्या NEET आणि JEE च्या  परीक्षांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशात आज आंदोलनं केलं आहे. सोशल मीडियावर #SpeakUpForStudentSafety या हॅश टॅग अंतर्गत देशभर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या परीक्षेविरोधात आपली मतं सोशल मीडियावर मांडत आहेत. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी या आंदोलनात भाग घेताना केंद्र सरकारने राज्य सरकारची, विद्यार्थ्यांची भूमिका ऐकून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको अशी भूमिका त्यांनी मांडली.

काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे कि , कोरोनाचं गंभीर संकट व अनेक राज्यात असलेल्या महापूराच्या संकटात  NEET आणि JEE च्या परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. मोदी सरकारने निर्णय घेण्याआधी विद्यार्थ्यांची बाजूही समजून घ्यावी, तर मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की,  NEET आणि JEE परीक्षांबाबत बाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या चिंता रास्त आहेत. केंद्र सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे, त्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आवश्यक आहे. पण सोबतच विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता देखील महत्वाची आहे.

दरम्यान लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भूमिकेचा आम्ही निषेध करतो असे मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सत्यजीत तांबे म्हणाले की, कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने JEE आणि NEET च्या परिक्षा घेणे हा विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवाला मोठा धोका आहे.  खासदार राजीव सातव यांनी ,  कोरोनाचं संकट गंभीर आहे. रेल्वे-विमानसेवा अशी दळणवळणाची साधनेही सुरळीत झालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये  JEE आणि NEET च्या परिक्षा आत्ताच झाल्या पाहिजेत असा मोदी सरकारचा अट्टाहास का?, असा सवाल केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!