Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अयोध्या राम मंदिर भूमिपूजन : राजीव गांधींचे आहे पण , राम मंदिर उभारणीत मोदींचे काहीही योगदान नाही , खा. सुब्रम्हण्यम् स्वामी यांची टोलेबाजी

Spread the love

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आणि त्याचे श्रेय घेण्यावरून भाजप अंतर्गत वादविवाद चालूच असून भाजपचे खासदार आणि दिग्गज नेते सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल करून नरेंद्र मोदी यांना घराचा आहेर दिला आहे. राम मंदिरासाठी पंतप्रधानांचं काहीही योगदान नाही. सगळं काम आणि कोर्टातली लढाई आम्ही लोकांनी केली आहे. यात राजीव गांधी यांचं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘टीव्ही -९  भारतवर्ष’च्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हि टिप्पणी केली .  दरम्यान सुब्रम्हण्यम स्वामी हे आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. मात्र राम मंदिराच्या प्रश्नावरून थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

या वृत्त वाहिनीने जेंव्हा , तुम्हाला भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं नाही का ? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले, निमंत्रण मिळालं असतं तरीही मी कार्यक्रमाला गेलो नसतो. पंतप्रधानांचं यात काहीही योगदान नाही. ज्यांचं योगदान आहे त्यांची नावं मी दिली आहेत. यात माजी पंतप्रधान राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरही त्यांनी टीका केली. वाजपेयी यांनीच राम मंदिराच्या कामात अडथळे आणले होते, अशी माहिती अशोक सिंघल यांनीच मला दिली होती असंही त्यांनी सांगितलं.

असा आहे भूमिपूजन कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑगस्टला सकाळी अयोध्येत येणार आहे. त्यामुळे सुरक्षा संस्था जास्तच अलर्ट झाल्या आहेत. 3 ते 5 ऑगस्ट या दरम्यान दहशतवादी हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्तचर संस्थाही सक्रीय झाल्या असून सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत. 3 ऑगस्ट – गणेश पूजा, 4 ऑगस्ट – रामार्चन, 5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत. हे मंदिर 161 फुटांचे  असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. राम मंदिराचं गर्भगृह असलेल्या जागेवर 200 फुटांखाली ‘टाइम कॅप्सुल’मध्ये  राम मंदिराचा इतिहास ठेवला जाणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे  सदस्य कामेश्वर चौपाल यांनी म्हटलं होत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्रस्टचे महासचिव आणि प्रवक्ते चंपत राय यांनी मात्र अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. चंपत राय म्हणाले, अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नाही. तुम्ही ट्रस्टने जे अधिकृत निवेदन दिलं त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांमध्येच ताळमेळ नसल्याचं पुढे आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!