Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : शहा-फडणवीस तासभर चर्चा… उद्या पंतप्रधानांना भेटणार?

Spread the love

माझी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर ऑपरेशन लोटसबाबत मोठे विधान केले आहे. ऑपरेशन लोटस तयार झालेले नाही. त्याची चर्चाही झाली नाही. महाराष्ट्रातील सरकार त्यांच्याच अंतर्विरोधाने पडेल. त्यानंतर काय करायचे ते ठरवू, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज शहा यांना भेटल्यानंतर उद्या फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रातील चार नेत्यांना घेऊन दिल्लीत पोहोचले. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. बंद खोलीत झालेल्या या चर्चेदरम्यान शहा-फडणवीस यांच्याशिवाय कोणीही नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. त्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्या करोनाचे संकट आहे. त्यामुळे आमचा महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा कोणताही हेतू नाही. आम्हाला सरकार पाडण्यात इंट्रेस्टही नाही. ही करोनाची लढाई आहे. ती कशी लढता येईल, यावर आमचा भर आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे अंतर्विरोधाचे सरकार आहे. जोपर्यंत चालायचे तोपर्यंत चालेल. पडल्यानंतर काय करायचे ते बघू, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे. तसेच शहा यांच्यासोबतच्या बैठकीत कोणताही राजकीय अजेंडा नव्हता. शेतकऱ्यांच्या एफआरपी संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. ही राजकीय भेट नव्हती, असे सांगतानाच ऑपरेशन लोटस तयार झालेले नाही. ऑपरेशन लोटसची बैठकीत चर्चाही झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान शहा यांना राज्यातील करोनाच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. कोरोना नियंत्रणात काय केले पाहिजे यावर त्यांच्याशी चर्चा केली. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली असून उद्या त्यांचीही भेट घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाजॉब्सच्या जाहिरातीवरील फोटोवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जाहिरातीत कुणाचाही फोटो लावा. कितीही मोठा फोटो लावा. तुम्हाला काय मारामाऱ्या करायच्या त्या करा, भांडणं करा, पण जनतेला नोकऱ्या द्या. त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. यावेळी फडणवीस यांच्यासोबत खासदार रणजितसिंह निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडीक, विनय कोरे आणि जयकुमार गोरे दिल्लीत आले होते. शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतही राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचेही फडणवीस म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!