Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaCurrentNewsUpdate : दुपारी आणखी सहाची वाढ , औरंगाबाद जिल्ह्यात 1179 कोरोनाबाधित, मृत्यूंची संख्या 41 वर

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला आहेत.

कोरोनाबाधित्यांच्या मृत्यूची संख्या ४१ वर

औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ४१ झाली आहे. तसेच आतापर्यंत ११७३ बाधित आढळून आले आहेत, तर ४५१ बाधित करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आसेफिया कॉलनी येथे राहणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीला १९ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया होता. त्याशिवाय त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यातच त्याला करोनाचा संसर्ग झाल्याने उपचार सुरू असतानाच काल बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी त्याचा स्वॅब रिपोर्ट आला असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तसेच रेहमानिया कॉलनी येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यालाही दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया झाला होता. शिवाय त्याला गंभीर श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक आजार असल्यामुळे उपचार सुरू असताना काल बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे बुधवारी सायंकळी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन स्पष्ट झाले, असे घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ४१ झाली आहे. यातील ३८ बाधितांचे मृत्यू हे घाटीमध्ये झाले आहे, तर एक मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये व दोन मृत्यू हे शहरातील खासगी रुग्णालयामध्ये झाले आहेत.

संपर्कामुळे होते आहे कोरोनाची वाढ

जळगाव, अकोला आणि बीडमध्ये आज आणखी २५ नवे करोनाबाधित सापडले आहेत. यात जळगाव येथील ५, अकोल्यातील १६ आणि बीडमधील ४ करोना रुग्णाचा समावेश आहे. संपर्कातून या सर्वांना करोनाची लागण झाल्याचे  वैद्यकीयअधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयितांपैकी ४९ जणांचे तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी ४४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये जळगावातील दोन तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता ३५१वर गेली आहे.

अकोल्यात ७ महिलांना करोना

अकोल्यात आज १०४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सापडलेल्या १६ करोनाबाधितांमध्ये ९ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. त्यात रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील ३, फिरदौस कॉलनीतील, डाबकी रोड आणि नायगाव येथील प्रत्येकी दोघांचा तर रजतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, अकोल्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३२४ झाली आहे. अकोल्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. अकोल्यात सध्या ११२ जणांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईहून बीडमध्ये आलेल्या चौघांना करोना

बीड जिल्ह्यात आणखी चार रुग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. बीडमध्ये ११४ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी चौघांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर ९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये पाटोदा तालुक्यातील तीन व वडवणी तालुक्यातील एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. पाटोदा तालुक्यातील वाहली येथे दोन महिलांना तर पाटोदा शहरातील एकाला करोनाची लागण झाली आहे. वडवणी येथेही एका ज्येष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाली आहे. हे चारही जण मुंबईहून आलेले असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बीडमध्ये आज मुंबईहून आलेल्या चौघांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने येथील उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांची संख्या १६ झाली आहे. वडवणी आणि पाटोदा शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने येथील तीन किलोमीटर परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. तसचे बीडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन तयार करण्यात आले आहेत. ही संचारबंदी अनिश्चित कालावधीसाठी राहणार असल्याचंही रेखावार यांनी सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!