#CoronaVirusUpdate : मुंबईतील रुग्णांची संख्या १७ हजारावर , दिवसभरात ९३३ रुग्णांची भर ….
मुंबईत काल ९९८ नवे रुग्ण सापडलेले असतानाच त्यात आज आणखी ९३३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ५१२वर गेली आहे. तर आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील करोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या ६५५ वर गेली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज ६५० संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती केले आहे. तर करोनाच्या संशयावरून भरती करण्यात आलेल्या २३१ रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज मुंबईत एकूण ९३३ नवे करोना रुग्ण सापडले असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १७५१२ झाली आहे. तर आज ३३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, आज मुंबईत ३४ रुग्ण दगावल्याने मुंबईतील मृतांचा आकडा ६५५ वर गेला आहे. पालिकेने आज करोनाने ३४ जण दगावल्याचं सांगितलं असलं तरी त्यातील १० रुग्णांचा मृत्यू १० ते १२ मेच्या दरम्यान झाला होता. त्यावेळी त्यांचा स्वॅब चाचणी अहवाल आला नव्हता. आज हा अहवाल आला असून त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या ३४ रुग्णांपैकी १६ रुग्णांना इतरही आजार होते. आज दगावलेल्यांमध्ये २१ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघे ४० वर्षाखालील, १३जण ६० वर्षांवरील आणि १८ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते, असं पालिकेनं म्हटलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १०९ रुग्ण एकट्या धारावी, माहीम आणि दादरमधील आहेत. धारावीत आज ८४ रुग्ण सापडले असून धारावीतील रुग्णांची संख्या ११४५ झाली आहे. धारावी परिसरात माटुंगा लेबर कँम्पमध्ये सर्वाधिक १७ रुग्ण सापडले आहेत. तर माहीममध्ये १४ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या १७६ झाली आहे. तर दादरमध्ये ११ रुग्ण सापडल्याने दादरमधील रुग्णांचा आकडा १५० झाला आहे.
मुंबई शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा ह्या करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या सोमवारपासून वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बीकेसीमधील करोना केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी माध्यमांना टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली आहे. नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही अशा प्रकारे करोना केअर सेंटर्स उभारली जातील असे टोपे म्हणाले.
