Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : या “कोरोना कथा ” बघाच , 900 कोरोनाग्रस्तांच्या शहरात 15 मे पर्यंत 255 जण कसे झाले कोरोनामुक्त ?

Spread the love

औरंगाबाद जिल्हयात कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी तपासणी सुविधा वाढवण्यात आली आहे.त्यामुळे रुग्णांचे निदान वेळेत होत असून त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार करणे शक्य होत आहेत. प्रशासनामार्फत सर्व रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळण्याच्या उद्देशाने महानगर पालिका,जिल्हा शल्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालय घाटी या तिन्ही आरोग्य यंत्रणांच्या  माध्यमातुन त्रिस्तरीय पद्धतीने उपचार प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मनपामार्फत संशयित रुग्णांची तपासणी करणे आणि प्राथमिक स्तरातील रुग्णांना महानगर पालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार देण्यात येत आहेत. तर लक्षण आढळून आलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन दहा दिवस उपचार दिल्या नंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. तर अतिगंभीर रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालय घाटी येथे उपचार करण्यात येत आहेत.

डॉ. कानन येळीकर सांगतात….

डॉ. कानन येळीकर,  अधिष्ठाता,शासकीयवैद्यकीय महाविदयालय व रुग्णालय घाटी, म्हणतात की, शासनाने लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु केला आहे. ही कोरोनाला रोखण्याची पुन्हा मिळालेली एक संधी आहे. आता तरी नागरिकांनी या लॉकडाऊनचे योग्य पालन करुन स्वतःसोबतच इतरांच्या जीवीताची काळजी घ्यावी. कोरोनाची काही लक्षणे आढळून आली तर ताबडतोब दावाखान्यात यावे , जेणेकरुन कोरोना प्राथमिक अवस्थेत असतानाच त्यावर उपचार सुरु करता येतात.तसेच ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदय आणि किडनी यांच्याशी संबंधित आजार आहेत, अशांनी नॉन कोवीड  दवाखान्यात जाऊन नियमित आपली तपासणी करुन मधुमेह तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात आहे का याबाबत सतर्कता बाळगणे, वेळेवर औषध गोळ्या घेणे आवश्यक आहे. कारण अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग रोखणे जास्त   जिकरीचे असते. आरोग्य यंत्रणांना, प्रशासनाला सहकार्य करत नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास आणि खबरदारी घेतल्यास निश्चित कोरोनाला रोखण्याची आपली लढाई यशस्वी होईल.
घाटीत सध्या  ६८ कोवीड पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यापैकी पंधरा रुग्णांना बरं करुन घरी सोडण्यात आले आहे. सगळया  अतिगंभीर स्थितीतील रुग्णांवर घाटीत उपचार करण्यात येत आहे.

रुग्णालयात आम्हाला घरच्यासारखे  सांभाळले …

श्रीनिवास कॉलनी येथील एका कोरोनामुक्त महिलेने  सांगितले की, दिर आणि जावेला लागण झाल्याने मला ही लागण झाली आणि आमच्या घरात आम्ही तिघे कोरोनाबाधीत झालो. या काळात आम्हाला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांनी  काळजी घेत घरच्यांसारखं संभाळले. तसेच आमच्या कॉलनीतील सर्व शेजारी लोकांनी आमच्या मुलांना पंधरा दिवस खाऊपिऊ घालणे, घरच्यांना मानसिक आधार देत माणूसकीचे खुप चांगले दर्शन घडवले. विशेष म्हणजे आम्ही दवाखान्यातुन घरी आलो तेव्हा  कॉलनीतील सर्व लोकांनी टाळ्या वाजवत आमचे उत्साहात स्वागत केले. आम्ही बरे झाल्यावर ही आमच्या जेवणाची काळजी घेतली. या आजारामुळे जीवनाची, चांगल्या लोकांची किंमत नव्याने कळाली.रुग्णांनी घाबरुन न जाता खंबीरपणे डॉक्टरच्या उपचारला साथ दिली तर नक्कीच बंर होऊन आपण घरी येतो, असा विश्वास या कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केला.

खुदा कि इनायत आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आम्ही एकाच घरातील १३ लोक बरे झालो

टाऊन हॉल , नुर कॉलनी येथील एकाच कुटुंबातील तेरा लोकांना कोरोनाची लागण झाली त्यात रुग्णांच्या आईवडील,बायको तीन मुलांसह यात अगदी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळासह इतर कुटंबियांचा समावेश होता.पण खुदा कि इनायत आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे , योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे आम्ही सगळे कोरोनामुक्त झालोत.आता फक्त आमचे वडीलांवर घाटीत उपचार सुरु आहेत.या काळात जिल्हा रुग्णालयात आम्ही सगळे दाखल होतो तिथे डॉक्टरांनी , त्यांच्या सर्व सहकारी यांनी खुप चागंली काळजी घेतली. आम्हाला बरं  करण्यासाठी खुप  सहकार्य केल्याच्या कृतज्ञ भावना या कोरोनामुक्त व्यक्तिने व्यक्त केल्या.

सासऱ्यांच्या मृत्यूमुळे लोकांकडून वाईट अनुभव , पण डॉक्टरांनी धीर दिला…आणि आम्ही दुःखातून बाहेर आलो

सास-यांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचा आघात सहन करत असतानांच आपण स्वतः कोरोनाबाधीत झाल्याचे कळाल्यावर सुरवातीला काही काळ भीती वाटली.पण त्यापेक्षा ही कोरोनाने मृत्यु  झाल्याने त्या दुःखद प्रसंगातही काही लोकांनी ज्या पद्धतीने चुकीचे वतर्न आमच्यासोबत केले त्यामुळे आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास जास्त झाला.पण सगळीच माणसे वाईट नसतात काही चांगली माणसे ही आहेत त्याचा अनुभव ही मी या संकटाच्या काळात घेतला.मी आज कोरोनामुक्त होण्यात अशाच चागंल्या माणसांचा,जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स,नर्स त्यांचे सहकारी या सगळ्यांचा मोठा वाटा आहे.रुग्णांनी घाबरुन न जाता हिमतीने या आजारात आपले मनोधैर्य कायम ठेवावे ,असे कोरोनामुक्त महिलेने सांगितले. औरंगाबाद मधील पहिल्या कोरोनामुक्त महिलेनेही या आजारांमध्ये भीती ऐवजी खबरदारी बाळगावी.आपली इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या उपचारांवर विश्वास ठेवून बरं होता येते असे मत व्यक्त केले.

आरोग्य यंत्रणा कोरोनासाठी सक्षम : डॉ सुंदर कुलकर्णी

डॉ सुंदर कुलकर्णी , जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, म्हणाले  की – मनपा तर्फे कोरोना संशयितांची शोध मोहीम राबवण्यात येत असल्याने वेळेत रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करणे शक्य होत आहे.त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यांच्यावर वेळेत उपचार होत असल्याने आपल्या जिल्हयाचा मृत्युदर ही कमी आहे.वेळेत रुग्णांवर उपचार होत असल्याने घरी सोडण्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे ही चांगली बाब असून रुग्णांना बरं करण्यासाठी मनापा,जिल्हा रुग्णालय आणि घाटी आम्ही तिन्ही यंत्रणा सक्षम आहोत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर निश्चितच कोरोना संसर्ग रोखण्यात आपण यशस्वी होऊ.

जिल्हा शल्य रुग्णालयात १४० खाटांची व्यवस्था असून सध्या तिथे ११३ रुग्ण दाखल आहेत. कोरोनाची ठळक लक्षणे दिसून येणा-या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.पाच सहा दिवस उपचार केल्या नंतर सुधारणा होत असलेल्या रुग्णांना मनापाच्या कोवीड सेंटर मध्ये पुढील देखभालीसाठी परत पाठवले जाते जेणेकरुन नवीन पॉझिटिव्ह रुग्णांना अत्यावश्यक उपचार देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात खाटा उपलब्ध होतील. विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात दहा दिवस उपचार केल्यानंतर तब्बेतीत सुधारणा झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत असून आता पर्यंत  ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहितीही  डॉ.कुलकर्णी यांनी दिली.

नियमांचे पालन करा

लॉकडाऊनच्या आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपण, आपल्यासह इतरांचही जीवन सुरक्षित करु शकतो. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याच्या आपल्या या लढाईला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून सतर्कता बाळगणे हे तुमच्या, आमच्या सगळ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी खुप महत्वाचे आहे. काळजी,भीती करण्यापेक्षा योग्य त्या गोष्टींची काळजी घेत कोरोनामुक्तीच्या लढाईत आपले योगदान देऊ या…. प्रशासनाला,आरोग्य यंत्रणेला म्हणजेच आपल्याला सहकार्य करु या..‌..

आपलं सरकार

Click to listen highlighted text!