Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती : लेखणीची संपत चाललीय धार अन शेतकरी होतोय हद्दपार… !!

Spread the love

‘ईडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो’ हि म्हण आपल्या देशातील माता भगिनी गेली शेकडो वर्षे पुन्हा पुन्हा अंतरिक भावनेने म्हणतात कारण बळीराजाच्या राजवटीत सारी जनता कुशल मंगल व आनंदित होती अन खास करून शेतकरी बांधव यांना सोन्याचे दिवस होते. बळीराजाच्या राजवटीचा दैदिप्यमान इतिहासाचे मौलिक धडे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी बाल शिवबाला दिले व स्वराज्याची भक्कम पायभरणी झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी लिहलेले अंभग म्हणजे स्वराज्याचा वैचारिक कळस ठरला. समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांनी करणे अपेक्षित आहे व तशी फार मोठी वैभवशाली समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे पण हा इतिहास आता इतिहास जमा होवू पाहतोय ? हे आजचे जळजळीत दाहक वास्तव आहे. या यक्ष प्रश्नांवर भाष तर करणे दूरच पण आपल्या लेखणीतून वास्तव चिञण करण्याची साधी तसदी हि इथल्या  कथाकथित लेखकांनी घेतली नाही की त्यांना घ्यावासी वाटली नाही हा प्रश्न लाख मोलाचा आहे.


अनिष्ठ चाली रूढींवर जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी अंत्यत मार्मिक भाष्य केले “आम्हा घर धन शब्दांचीच रत्ने ” शब्दांची यत्ने शस्ञ करू “ या अभंगातील त्यांनी मांडलेले तत्वज्ञान हे सर्व कालीन विचारवंत लेखकांसाठी आदर्शवत आहे.” बरे झालो देवा कुणबी झालो “ असे मत अभिमानाने तर व्यक्त केलेच पण नुसतेच मत व्यक्त करून संत तुकाराम महाराज थांबलेले नाहीत तर कृती हि केली. त्यांचे वडील महाजन होते महाजन म्हणजे सावकारांचे सावकार ते दक्षिण भारतातील एकमेव महाजन होते. शब्द श्रीमंती तेवढीच धन श्रीमंती हि होती. वडिलांचा हा पांरंपारीक व्यावसायिक वसा व वारसा त्यांनी विनम्रपणे नाकारून सामान्य कष्टकरी शेतकरी यांच्या कर्जाचे बाढ इंद्रायणी नदीत बुडवले ती जगातील पहिली कर्जमाफी होती! त्यांचे अलौकिक विचारधारा छञपती शिवाजी महाराज यांनी अंगीकृत करून आचरणात आणली व दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांचा  शेतसारा माफ केला. पशुधन दिले, अवजारे दिले , शेतकरी वर्गासाठी बिन व्याजी कर्ज दिले हि आजवर जगातील इतिहासात शेतकरी वर्गासाठी राबलेले आदर्शवत कृषी वित्त धोरण आहे.

कुठल्याही मोहिमेवर जात असताना माझ्या शेतकऱ्यांच्या  भाजीच्या देठाला धक्का लागता कामा नये अशी सक्त ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला दिली होती. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील इतका वैभवशाली समृद्ध वैचारिक कृतीशाल वसा व वारसा लाभलेले आपले महाराष्ट्र राज्य याच समृद्ध महाराष्ट्रात सध्या शेतकरी अंत्यत बिकट परिस्थितीत आपले जीवनमान व्यथित करीत आहे.सततच्या दुष्काळामुळे,नापिकीमुळे हजारो शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. त्यांची कुंटूंबं उघड्यावर येत आहे क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत आहे. आत्महत्या होत नाहीत असा दिवसच उजडत नाही गेली काही वर्षे हे दुष्टचक्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे विदर्भात सुरू झाले हे आत्महत्येचे सञ पुढे मराठवाडात पसरले व आजहि हे तसेच सुरू आहे हे विदारक वास्तव काळीज पिळवटून टाकणारे आहे. हया भयान वास्तवावर जेवढी गंभीर चर्चा व विचार व्होणे अपेक्षित होते ते होताना दिसत नाही अन् सरकारी उपाययोजनांवर न बोललेलेच बरे! सरकार ह्यांचे आहे त्यांचे शेतकरी आत्महत्याचा आकडा कमी होताना दिसत नाही तर या दिवसा गणिक तो वाढतानाच दिसतो राजकीय व्यक्ती माञ फक्त श्रेयाचे ढोल बडवण्यात मश्गुल आहेत कर्जमाफी की कर्ज मुक्ती या शब्द छळांचे रोज अत्याचार चालू आहेत. अशा मन विषन्न करणाऱ्या  यंञणेवर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी सांगितला शेतकऱ्यांचा  आसूड घेऊन पाठ मऊ करावी वाटते , पण काय करणार ना ? आपल्या देशात लोकशाही आहे अन आपण लोकशाहीला मानतो.

समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांनी करणे अपेक्षित आहे व तशी फार मोठी वैभवशाली समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे पण हा इतिहास आता इतिहास जमा होवू पाहतोय ? हे आजचे जळजळीत दाहक वास्तव आहे. या यक्ष प्रश्नांवर भाष तर करणे दूरच पण आपल्या लेखणीतून वास्तव चिञण करण्याची साधी तसदी हि इथल्या  कथाकथित लेखकांनी घेतली नाही की त्यांना घ्यावासी वाटली नाही हा प्रश्न लाख मोलाचा आहे.

ग्रामीण्र साहित्यिक प्राचार्य रा. रं बोराडे. इतिहास संशोधक डाॅ. आ.ह. साळुंखे डाॅ .लोकसाहित्यिक विठ्ठल वाघ. प्रा.भास्कर चंदनशिव, विश्वास पाटील .प्रा.इंद्रजितभालेराव, सदानंद देशमुख या मान्यवर लेखकांच्या साहित्यकृतींतून कृषी संस्कृती इतिहास व मानवी जीवनावर प्रभावीपणे भाष्य झाले हे कुणीच नाकारीत नाही पण हि प्रभावळ फार मोठी झाली नाही याचे हि मनात अतीव दुःख आहे. बाकी शब्दबंबाळ हायब्रीड वाणाच्या लेखकां बद्दल काय बोलावे? कल्पनाविलास विश्वावात रममाण होणारी हि जमात व जमातातील इरसाले नमूने म्हणजे बोधट, निगरगठ्ठ  झालेली मनं व ह्यांची हरवलेली संवेदना! मग कुठल्या अर्थाने हे लेखक आहेत. ज्या समाजात आपण राहतो त्या समाज्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यकृतींतून उमटत नाही हे नक्की अन्नच खातात का ?असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.

विचार अन आचार याची कृतीशील सांगड घालून इतिहास निर्माण करणारी संत तुकोबांची परंपरा कुठे व याच महाराष्ट्रातील सद्य:कालीन साहित्यिक व यांची परंपरा कुठे ? आपण तुकोबांच्या दाखवलेल्या मार्गानी का चालत नाही? कृती करीत नाही ?असे प्रश्न तरी पडतात का सुध्दा एकच मोठा प्रश्न आहे कधी न सुटणारा?

कुंभकर्णीय नीद्रा अवस्थेतून समाजाला दिशा दाखवण्याची डंका पिटणाऱ्या  लेखक आणि विचारवंतानी आपल्या दशेतून व कल्पना विलासाच्या नशेतून बाहेर यावं जर शक्य असेल तर ? व आवश्यक वाटत असेल तर? एकीकडे मंदिराचे मखर सोन्याचे, कळस सोन्याचा, देव सोन्याचे होत आहेत व काळया मातीतून सोनं पिकवणारा सोन्या सारखा शेतकरी व त्याचं जीणं मातीमोल किंमतीचं ठरतं आहे. शेतकरी आत्महत्या मुळे हजारो कुंटंबं देशोधडीला लागत आहे हे कटू वास्तव आहे. अशा गंभीर पार्श्वभूमीवर  करोडो रुपये खर्च करून पंचतारांकित साजरे होणारे  इव्हेन्ट कम साहित्य साहित्य संमेलन आयोजित करून त्या मध्ये शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा किती अंतर्भाव असतो? याचा वेळ मिळाला तर विचार करा, लाखो रूपये सरकार कडून उत्सव साजरे करण्या ऐवजी  साधेपणाने हि संमेलन भरवून सरकार अनुदान घेणे बंद केले पाहिजे कारण बुध्दी प्रमाण्यवादी लोकांकडून ऐवढी माफक अपेक्षा तरी ठेवता येईल का ? समाजाला दिशा दाखवणारा दिशा दर्शकच राज्याला, देशाला नैतिकेतेची संस्कारक्षम मार्ग दाखवू शकतो विचार व कृती याचा संत तुकाराम यांनी घालून दिलेले आदर्श उदाहरण स्मरून साहित्यिक या सन्ममार्गाने चालवेत या प्रतिक्षेत समाज भाबडी आस लावून बसलायं! हा गर्द काळोख दूर व्हावा व माझ्या बळीराजा पुन्हा एकदा आनंदात न्हाऊन जावा यासाठी हा केलला शब्द प्रपंच!

– शरद गोरे
इतिहास संशोधक
9922300362

आपलं सरकार

Click to listen highlighted text!