Aurangabad : तरूणाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून, शहानूरमिया दर्गाह परिसरातील खळबळ जनक घटना

औरंंंगाबाद : शहानूरमिया दर्गाह परिसरातील हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पित बसलेल्या युवकाच्या डोक्यात कुर्हाडीने अत्यंत निर्दयीपणे वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.३०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी शेख नईम शेख सलीम उर्फ गोरु(२२) याला अटक केली आहे.
शेख सुभान शेख आमेर (वय ३०, रा. शम्सनगर, नुर चौक, शहानुरमियाँ दर्गाह परिसर) असे मयत युवकाचे नाव आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसाच्या काळात शहरात खूनाची दुसरी घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सुभान हा बुधवारी रात्री उस्मानपुरा परिसरातील रमजानी हॉटेल येथे मित्रासोबत चहा पीत बसला होता. त्यावेळी शेख नईम शेख सलीम उर्फ गोरू, शेख अलीम शेख सलीम उर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम (सर्व रा. शम्सनगर, शहानुरमियाँ दर्गाह परिसर) हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले व काही समजण्याच्या आतच त्यांनी शेख सुभान याच्यावर धारदार कुर्हाडीने डोक्यात वार करण्यास सुरूवात केली. कुर्हाडीच्या घातक प्रहाराने शेख सुभान हा रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. बेशुध्द झालेल्या शेख सुभान याला हॉटेलमध्ये मित्रांनी व काही नागरीकांनी तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शेख सुभान याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.
महिनाभरापुर्वी झाला होता वाद
मयत शेख सुभानला तीन मुली आणि दोन मुले आहेत. सुभान आणि शेख परिवार हे समोरा-समोरच राहतात. महिनाभरापुर्वी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून दोन्ही परिवारात जोरदार वाद झाला होता. हा वाद पोलिसातही गेला होता. परंतु समाजातील प्रतिष्ठीत नागरीकांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले होते. मात्र शेख नईम उर्फ गोरू याच्या मनात शेख सुभान याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग होता. त्या रागातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.