Aurangabad : उपजिल्हाधिकारी दिपक घाटगे यांची आत्महत्या

औरंंंगाबाद : भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी दिपक रामराव घाटगे (वय ४५, रा. उर्जानगर, सातारा परिसर) यांनी बुधवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.पोलिस उपायुक्त डाॅ.दिपाली घाटगे यांचे ते सख्खे बंधू असल्याची माहिती पोलिसनिरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी दिपक घाटगे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते, आजाराला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून दिपक घाटगे हे कार्यरत होते. घाटगे हे गेल्या काही महिन्यापासून आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. निवडणूकीच्या काळात त्यांना सुटी न मिळाल्याने आजारी असतांना देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. कार्यालयात त्यांच्या मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे करून घेत होते. बुधवारी मध्यरात्री ते घरी असतांना त्यांना आवाज दिला परंतु खोलीतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दिपक घाटगे यांनी गळफास घेतला असल्याचे दिसून आले.
दिपक घाटगे यांना तात्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.