वाहन परवान्याच्या अखेरच्या तारखेकडे लक्ष द्या अन्यथा सहन करावा लागेल हा त्रास ….

देशात आलेल्या नवीन परिवहन कायद्यानुसार वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कालबाह्य झाल्यानंतर वर्षभराच्या आत परवान्याचं नुतनीकरण न केल्यास तुम्हाला पुन्हा एकदा लर्निंग (प्रशिक्षणार्थी) परवान्यासाठी अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर कायम परवान्यासाठी ३० दिवस अर्थात एक महिना प्रतीक्षा करावी लागेल. सध्या राज्यात परवाना संपलेले वाहन चालवताना पकडले गेल्यास ५०० रुपये दंड करण्याची तरतूद आहे.
मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत महाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “आम्ही सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत काम करण्यास बांधील आहोत. महाराष्ट्राने राज्यातील सर्व ५० आरटीओमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे”, असं याबाबत बोलताना आरटीओ अधिकारी अभय देशपांडे म्हणाले. तसंच, यापुढे परवाना संपलेल्या व नूतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जांवर यापुढे विशेष ट्रीटमेंट केली जाणार नाही. त्यांना लर्निंग लायसन्सच्या अर्जांप्रमाणेच वागणूक दिली जाईल. याशिवाय कायम परवान्यासाठी एक महिन्याच्या प्रतीक्षेतही सूट मिळणार नाही असंही देशपांडे यांनी स्पष्ट केल आहे .
नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचालकांना नव्या नियमांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आता नव्या नियमांनुसार, मूळ स्थानाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत जमा करुन तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. अशाचप्रकारे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुम्ही तुमच्या पत्त्याचा( होम टाऊन) पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकतात.