Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री रामदास कदम यांच्या वक्तव्याची ” निरर्थक ” म्हणून गिरीश महाजनांनी उडवली रामदास कदम यांची खिल्ली

Spread the love

युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसांत जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

गिरीश महाजन युतीवर बोलताना पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची बुधवारी चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक झाली. येत्या 2 दिवसांत युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.

युतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या काळातच ठरला आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी कदम यांचे वक्तव्य निरर्थक असल्याचे म्हटले आहे. युतीत मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप काय निर्णय झालाय, याची आपल्याला माहिती नाही. पण याबाबतचा निर्णय देखील अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे सांगत महाजन यांनी कदम यांचा दावा खोडून काढला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येण्यास उत्सूक आहेत.  मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर होणार आहे, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दोघांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. कारण ते त्यांच्या संपर्कात आहेत, असे महाजन यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!