Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सक्रिय , अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

Spread the love

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी आज पूरग्रस्त गावांची पाहणी केली.  कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ४ लाख ५० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच, सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे  असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तात्काळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

कोल्हापूर व सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शिवाय, स्थानिक प्रशासनाबरोबरच ओदिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची २२ तसेच नौदलाची २६, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये २ व कोल्हापुरात ९ पथकं, सैन्यदलाचे ८ पथक, तर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथकं कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात ७६ तर सांगलीमध्ये ९० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथकं कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे.  पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातळी आणखी कमी होण्यास मदत होईल. पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब १० हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब १५ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३९ गावे व सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ९० गावे अशी १२ तालुक्यातील ३२९ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख ५२ हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध २७० ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत वीस ते बावीस बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तसेच एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!