Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आनंदीबेन , लालजी टंडन यांच्या बदल्या , नव्या सहा राज्यपालांची नियुक्ती जाहीर

Spread the love

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी दोन राज्यांतील राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल व बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांचा  समावेश आहे. या दोघांनाही अनुक्रमे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनातून आज ही माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी व नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. या चारही राज्यांत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बिहार व मध्य प्रदेशमधील विद्यमान राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बिहारची जबाबदारी फगु चौहान यांच्याकडं देण्यात आली आहे. तर, नागालँड व त्रिपुराची जबाबदारी अनुक्रमे रमेश बैंस व आर. एन. रवी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पुढच्या दोन महिन्यांत आणखी पाच राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव २९ ऑगस्ट रोजी, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा ३० ऑगस्ट रोजी, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला ३१ ऑगस्ट रोजी, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह ३ सप्टेंबरला तर केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम ५ सप्टेंबरला आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.

राज्य सध्याचे राज्यपाल नवे राज्यपाल
उत्तर प्रदेश राम नाईक (कार्यकाळ पूर्ण) आनंदीबेन पटेल
पश्चिम बंगाल केसरीनाथ त्रिपाठी (कार्यकाळ पूर्ण) जगदीप धनखर
मध्य प्रदेश आनंदीबेन पटेल (बदली) लालजी टंडन
बिहार लालजी टंडन (बदली) फगु चौहान
त्रिपुरा कप्तान सिंह सोलंकी (कार्यकाळ पूर्ण) रमेश बैंस
नागालँड पद्मनाभ आचार्य (कार्यकाळ पूर्ण) आर. एन. रवी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!