Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई आणि कोकणात आज जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

वेगाने प्रवास करीत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सध्या नव्वद टक्क्य़ांहून अधिक महाराष्ट्र व्यापला असून, पुढील एक ते दोन दिवसांत मुंबई आणि कोकणच्या उर्वरित भागांतही मोसमी पाऊस कोसळणार आहे. ठाणे, डोंबिवलीसह मुंबईच्या उपनगरांमध्ये सोमवारी पूर्वमोसमी पावसाने सुखद गारवा निर्माण केला होता.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार २५ जूनला मुंबईसह कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. २६ ते २८ जून या कालावधीत कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबईच्या उपनगरांत दुपारी सुमारे तासभर पूर्वमोसमी सरी कोसळल्या. मुंबई शहराच्या भागांत आभाळ भरून आले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. काहीच भागांत एखादी रिमझिम सर वगळता फारसा पाऊस झाला नाही. शहरात आद्र्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे तापमान कमी असले तरी उकाडा जाणवत होता. मुंबई शहर, उपनगरांमध्ये रात्री साडेआठ वाजेपर्यंत ७ मिमि. पावसाची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा शाखेने केली आहे.  पावसाने जवळपास संपूर्ण जून महिना दडी मारली. त्यामुळे जून महिन्यात मुंबईत झालेला पाऊस हा सरासरीच्या निम्माही नाही. साधारणपणे जूनमध्ये सरासरी ४०० मिमिपेक्षा जास्त पाऊस पडतो. यंदा मात्र अद्याप १६५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.दरम्यान सोमवारी झालेल्या पावसाने कमाल तापमानातही घट झाली. कुलाबा शाखेने ३२.४ अंश सेल्सिअस कमाल आणि २७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे.  सांताक्रूझ विभागाने कमाल ३३.६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!