Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची बांगलादेशवर दणदणीत मात

Spread the love

डेव्हिड वॉर्नरचे घणाघाती शतक व कर्णधार अॅरन फिंच व उस्मान ख्वाजाच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८१ धावा केल्या खऱ्या; परंतु, विजय मिळवण्यासाठी त्यांना अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. अखेर ऑस्ट्रेलियाने हा सामना ४८ धावांनी जिंकून गुणतक्त्यातील अग्रस्थान पुन्हा मिळवले. ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने अखेरपर्यंत कडवी लढत देत ८ बाद ३३३ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर सौम्य सरकार चौथ्याच षटकात बाद झाल्यानंतर तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन यांनी ७९ धावांची भागीदारी रचून संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. शाकिबने ४१ धावा केल्या, तर तमिमने ७४ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर, मुश्फिकूर रहीम आणि महमदुल्ला यांनी पाचव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचून संघाला तीनशेपार पोहचवले. मुश्फिकूरने कारकिर्दीतील सातवे वन-डे शतक साजरे करताना ९७ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह नाबाद १०२ धावांची खेळी केली. महमदुल्लाने ५० चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६९ धावा फटकावल्या.

विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पूर्णपणे सार्थ ठरवला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा शतक करत संघाला आश्वासक धावसंख्येपर्यंत नेले. प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अतिशय चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या गड्यासाठी १२१ धावांची भागिदारी रचली. बांगलादेशच्या सौम्य सरकारने सलामीवीर अॅरॉन फिन्चला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. फिन्च ५३ धावा तंबूत परतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या उस्मान ख्वाजाने वॉर्नरला उत्तम साथ दिली. वॉर्नरने १४७ चेंडूत १६६ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ख्वाजा आणि वॉर्नरने दुसऱ्या गड्यासाठी तब्बल १९२ धावांची भागिदारी केली. उस्मान ख्वाजाने ७२ चेंडूत ८९ धावा केल्या. ख्वाजाचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने १० चेंडूत ३२ धावा करत संघाचा धावफलक हलता ठेवला. वॉर्नर, फिन्च आणि ख्वाजाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित ५० षटकांत ३८१ धावांचा मोठा पल्ला गाठला. दरम्यान, ४९ व्या षटकावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे काहीवेळासाठी खेळ थांबला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!