Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बहुचर्चित ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार मुंबई -पुणे, मुंबई नाशिक आणि मुंबई ते बडोदा , पुढील आठवड्यात चाचणी

Spread the love

बहुचर्चित ‘वंदे भारत’ ट्रेन  आता महत्त्वांच्या शहरांना जोडली जाणार असून पहिल्या टप्प्यात  मुंबई ते बडोदा, मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या मार्गावर सेमी स्पीडची ‘वंदे भारत’ लोकलची चाचणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉकचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी अग्रवाल यांनी सांगितले की, सेमी स्पीडच्या ‘वंदे भारत’ लोकलची चाचणी ही पुढील आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येईल. या दोन्ही मार्गावर एक एसी आणि एक मेमू वंदे भारत लोकलची चाचणी घेण्यात येईल. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या दरम्यान चाचणी घेत असताना ती यशस्वी झाल्यास, या शहरांत पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळ लागेल. या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसून, आमच्या वतीने केवळ शक्यता वर्तविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या याच मार्गावर एक्स्प्रेसने गेल्यास अडीच ते तीन तास लागतात.
लोकलचा वेग १६० किमीपर्यंत चालविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती आणि देखभाल करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांच्यामार्फत सीबीटीसी सिग्नल यंत्रणेवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन लोकल आणि मेल, एक्स्प्रेसमधील अंतर कमी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होईल. लोकलमध्ये किंवा लोकल मार्गात तांत्रिक बिघाड झाल्यास, स्थानकावरील प्रवाशांसह लोकलमधील प्रवाशांना यांची माहिती दिली जाईल.

दोन शहरांमधील प्रवास कमी अंतरात आणि कमी वेळेत होण्यासाठी, पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी मुंबई ते बडोदा, पुणे, नाशिक मार्गावर वंदे भारत मेमूची चाचणी घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी मेमू एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या असतील. मागील ५ वर्षांत रेल्वेमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानक स्वच्छ असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. दोन शहरांमधील अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी मेमू लोकल उपयुक्त आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरून रेल्वेचा विकास होईल, असे अग्रवाल म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!