Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup 2019 : भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय , भारतीयांना ईदची अनोखी भेट !!

Spread the love

देशभरात आज रमझान ईदचा माहोल असताना रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेची विजयानं सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखून गाठलं. आफ्रिकेचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. रोहित शर्मा भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने मैदानात टीच्चून फलंदाजी करत नाबाद १२२ धावांची दमदार खेळी केली तर धोनीने या विजयात ३४ धावांचं योगदान दिलं. शिखर धवन (८), विराट कोहली (१८) कमीत कमी धावात बाद झाल्यानंतर रोहित शर्माने संघाची धुरा सांभाळात भारताच्या धावसंख्येला विजयाच्या क्षणापर्यंत आकार दिला आणि भारत विजयी झाला जणू भारतीय संघाने भारतीयांना दिलेली हि रमझानची भेटच ठरली !!

प्रारंभीच्या षटकात भारतीय फलंदाजांना वेसण घालण्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आलं होतं. पण ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे आफ्रिकेने रोहितला बाद करण्याच्या दोन संधी गमावल्या. रोहित शर्माने मिळालेलं जीवनदान भारतीय संघाच्या सार्थकी लावत विजयी खेळी केली . धोनी(३४) बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने मैदानात फलंदाजासाठी येताच तुफान फटकेबाजी केली. हार्दिकने ७ चेंडूत नाबाद १५ धावा केल्या. प्रारंभी , सामन्याची नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराहची अचूक टप्प्यात गोलंदाजी आणि चहलच्या फिरकी जाळ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज निष्प्रभ ठरले. बुमराहने भेदक मारा करत आफ्रिकेच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडलं. सलामीजोडी तंबूत दाखल झाल्यानंतर आफ्रिकेच्या संघावर दबाव निर्माण करण्यात भारतीय संघाला यश आलं. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही. वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर यजुवेंद्र चहलने आपल्या फिरकीची जादू जगाला दाखवून दिली .

सामन्याच्या २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चहलने रासी दुसेर आणि फॅफ ड्युप्लेसिसची जोडी फोडली. रासी दुसेनला(२२) चहलने त्रिफळाचीत केलं. तर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चहलने कर्णधार फॅफ ड्युप्लेसिसची दांडी गुल केली. तर जेपी ड्युमिनीला कुलदीप यादवने अवघ्या ३ धावात  तंबूत परतण्यास भाग पाडलं . पुढे खेळपट्टीवर स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या घातक अँडिले फेहलुकवायोलाही (३४) चहलने तंबूचा रस्ता दाखवला. डेव्हिड मिलरला(३१) चहलने सामन्याच्या ३६ व्या षटकात बाद केलं. चहलने १० षटकांत ५१ धावा देत ४ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ दोनशे धावांच्या आत गारद होईल अशी चिन्ह असताना ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला. मॉरिसने ३४ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह ४२ धावांची खेळी साकारली. भुवेश्वर कुमारने मॉरिसला अखेरच्या षटकात बाद केलं. याच षटकात इम्रान ताहीरही अवघ्या श्यून्यावर झेलबाद झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!