Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील एकही जागा आघाडीला मिळू देणार नाही : विखेपाटील

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागावर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. आघाडीला जिल्ह्यात एकही जागा मिळू देणार नाही. बाराविरुद्ध शून्य असाच जिल्ह्यातील विधानसभा निकाल असेल, यात कोणतीही अतिशयोक्ती नाही, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते  पत्रकारांशी बोलत होते.

भाजप मध्ये जाण्यास माझा विरोध असण्याचे कारण नाही. फक्त माझा पक्षप्रवेश कधी होणार, हा निर्णय भाजप पक्षाध्यक्षांचा असेल, असे सांगत मला मंत्रिपद द्यायचे की नाही, हा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल. मला कोणती अपेक्षा नाही. माझ्यावर फक्त नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागा निवडून देण्याची जबाबदारी होती. ती मी व्यवस्थित पार पाडली आहे, असे विखे पाटील यांनी नमूद केले.

सत्तेत गेल्यानंतर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्यावर माझे प्राधान्य असेल. निळवंडे पाणी प्रश्नावर सातत्याने विखे कुटुंबाची बदनामी करण्याचा षडयंत्र राबवले गेले. त्यामागे राज्यात नेतृत्व करणारे विरोधक आणि जिल्ह्यातील त्यांचे पाठीराखे हेच होते. निळवंडेला नेमका विरोध कोणाचा आहे, हे आता लोकांना पुरते कळून चुकले आहे. निळवंडे कालव्याचे काम सुरू करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार निळवंडे कालव्याचे काम तात्काळ सुरू करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती विखे यांनी दिली.

विरोधकांना निळवंडे प्रश्नावर आज शहाणपण सुचले आहे. ते संगमनेर अकोल्याचे पुढारी सत्ता असताना झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित करीत या प्रश्नावर लोकांना कायम अडकवण्यात आले आणि बुद्धिभेद करण्यात आला, अशी टीका विखे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मधुकर पिचड यांचा नामोल्लेख न करता केली.  राज्यातील शेतकऱ्यांना स्थैर्य मिळून देण्यात मुख्यमंत्री सक्षम आहेत. इतरांनी दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा दुष्काळ निवारणासाठी कसे प्रयत्न करता येतील, यासाठी व्यापक भूमिका घ्यावी, असा टोला विखे यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!