मोदीभक्त इंडिया टीव्ही चा अंदाज : एनडीएला २७५ जागा मिळून पुन्हा सत्तेत येईल मोदी सरकार !!

महाराष्ट्रातही ४८ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा भाजपला
विश्वासाहर्ता गमावलेले चॅनल २०१९ च्या लोकसभेविषयी आपले अंदाज व्यक्त करीत असून अशाच मोदीभक्त चॅनलने आपल्या सर्वेक्षणात देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असे भाकीत केले आहे . त्यांच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला २७५ जागा मिळतील, यूपीएला १४७ जागा मिळतील तर अन्य पक्ष १२१ जागांपर्यंत मजल मारतील, असा अंदाज इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात अशा सर्वेक्षणावर लोकांचा किती विश्वास असतो हि बाब वेगळी आहे.
सर्वेक्षणातून लोकसभेच्या ५४३ जागांचा वेध घेण्यात आला असून भाजपला २३० जागा मिळू शकतात तर काँग्रेस ९७ जागांपर्यंत मजल मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवेसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९ जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगते.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा भाजपला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-भाजप युती ३४ जागांचा टप्पा गाठेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १३ जागा मिळतील व एक जागा अन्य पक्षाच्या खात्यात जाईल, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात ८० जागा असून भाजप- ४५, बसपा- १४, सपा- १५, काँग्रेस- ४ असे चित्र निकालातून पुढे येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर मोदींच्या लोकप्रियतेत वाढ
पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. नोकऱ्यांमधील नवे आरक्षण, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणे यांसारख्या तीन मोठ्या निर्णयांमुळे पंतप्रधान मोदी यांची घटत चाललेली लोकप्रियता पुन्हा शिखरावर पोहोचल्याचे एका सर्व्हेत सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ब्लूमबर्ग यांच्याकडून हा सर्व्हे करण्यात आला.
या सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी ४३ टक्के लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे वाटते. २०१४ च्या तुलनेत हा आकडा ७ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावेळी एक तृतीयांश लोकांना नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करावे, असे वाटत होते. नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी’ यांच्याकडून देशातील २९ पैकी १९ राज्यांमध्ये २४ ते ३१ मार्च या कालावधीत हा सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये १०,०१० जणांनी सहभाग नोंदवला.
मोदींच्या लोकप्रियतेचे तीन मुद्दे
२०१९ या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सवर्ण गरिबांसाठी १० टक्के लागू केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची घोषणा केली आणि पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केले. या तीन घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. बेरोजगारी आणि विकास हेच लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतील, असे मत सर्वाधिक लोकांनी व्यक्त केले आहे. उपरोक्त तीन मुद्द्यांमुळे मतदारांचे मत आणि प्राधान्य यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.