Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : काॅंग्रेसने जाहीर केला जाहिरनामा, जाणून घ्या काय आहे”जन आवाज”मध्ये….

Spread the love

देशभर सर्व पक्ष आणि नेते प्रचारात असतानाच लोकांच्या दृष्टीने आवश्यक असणारा जाहीरनामा आज काॅंग्रेसने प्रसिद्ध केला.

‘जन आवाज’ या नावाने काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर ‘हम निभाएंगे’ असं आश्वासन देण्यात आले आहे. दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेप्रमाणे शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जाईल असं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगात जावे लागणार नाही अशी तरतूद केली जाईल असं या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माहिती दिली. ‘आपल्या देशात उद्योजग मोठे कर्ज घेतात आणि बँकांना फसवून देशातून पळ काढतात. तर दुसरीकडे कर्ज न फेडू शकणारा शेतकरी तुरुंगात जातो. त्यामुळेच शेतीसाठी घेतलेलं कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. शेतकरी कर्जा संदर्भातील गुन्हे हे नागरी कायद्याअंतर्गत दाखल करण्याचा बदल आम्ही करु. त्यामुळे वेळेत कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना तुरुंगात जावे लागणार नाही,’ असं राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मध्यप्रदेश, राजस्थान येथे सत्तेत आल्यानंतर आम्ही अवघ्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती याचीही आठवण राहुल यांनी करुन दिली.

याबरोबरच राहुल गांधी यांनी देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी विशेष योजना आखल्याची माहिती दिली. मनरेगा अंर्तगत ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत स्तरावर १० लाख नोकऱ्या देणे शक्य असून आम्ही सत्तेत आल्यास ते प्रत्यक्षात करुन दाखवू अशा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला आहे.  रोजगार निर्मितीबरोबरच उद्योग व्यवसाय सुरु करण्यालाही विशेष प्राधान्य देण्यात येणार असून उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही परवाणग्या तसेच परवान्यांची गरज लागणार नाही, त्याचबरोबर पहिल्या तीन वर्षांसाठी कर सवलत देण्यात येणार असल्याची माहितीही राहुल गांधी यांनी दिली. मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले मात्र ते खोटे आश्वासन असल्याचे नंतर सिद्ध झाले. आम्ही मात्र ‘न्याय’ योजनेअंतर्गत गरिबांच्या बँक खात्यांवर वर्षाला ७२ हजार रुपये जमा करणार असून पाच वर्षात ही रक्कम ३ लाख ६० हजार इतकी होईल. हे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जातील, असेही राहुल यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!