Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी मोदींविरोधात एकत्र येऊयात : पवारांचे आपला आवाहन

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला कोणत्याही परिस्थिती रोखण्यासाठी विरोधक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्र यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी कोणत्याही परिस्थितीत आपबरोबर आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, पवार यांनी मात्र आघाडीसाठी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.

आपचे नेते संजय सिंग यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली. संजय सिंग यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी सर्वसंमतीने उमेदवार देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे काही नेते आपच्या नेत्यांशी तसेच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आघाडी करणे किती गरजेचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोदी सरकारमुळे देशाचे संविधान, लोकशाही संकटात आली आहे. अशावेळी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात लढले पाहिजे, असे शरद पवारांनी आपल्याला सांगितल्याचे संजय सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्ष नंतरही वाचवता येईल. त्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे असेल. आता देशाला आणि लोकशाहीला वाचवण्याची वेळ आहे. सध्या देश मोदी सरकारमुळे संकटात आहे, असे पवार म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

काँग्रेसने नुकतेच दिल्लीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीबरोबर आघाडी करण्यास अपयश आले आहे. त्याचबरोबर सपा, बसपा आणि रालोद यांच्याबरोबर उत्तर प्रदेशमधील महाआघाडीत सहभागी होता आलेले नाही. त्याचबरोबर बिहारमध्ये राजदबरोबरील जागा वाटपही संकटात आले आहे. त्यामुळे काँग्रेससमोरही नवे संकट निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस पी सी चाको यांनी दिल्लीमध्ये आपबरोबर आघाडी करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असल्याचे सांगितले. भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे पक्षाच्या कार्यकारिणीने ठरवले आहे. दिल्ली काँग्रेसनेही भावनेचा विचार करत आपबरोबर आघाडी करण्यासाठी सकारात्मक राहावे. याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी लवकरच घेतील, असेही त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!