Abhinandan: अभिनंदनच्या भेटीसाठी “ते” दिल्लीच्या वाटेवर …

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे आईवडील आज रात्रीच दिल्लीत दाखल होत असून चेन्नईतील मदमबक्कम येथील निवासस्थानाहून ते चेन्नई विमानतळावर दाखल झाले आहेत. रात्री उशिराच्या विमानाने ते दिल्लीत पोहचणार आहेत. भारतीय हवाई दलातील पायलट अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. कोणत्याही अटी-शर्तींशिवाय अभिनंदन यांना सोडण्यात यावे, असे भारताने स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरमाईची भूमिका घेत अभिनंदन यांची सुटका करण्याची तयारी दर्शविली.
अभिनंदन यांना उद्या (शुक्रवारी) सोडण्यात येईल, अशी घोषणा इम्रान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत केली. त्यामुळे अभिनंदन उद्या भारतात परतणार हे निश्चित झाले असून त्यांच्या वाटेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. वाघा सीमेवरून अभिनंदन मायदेशी परततील, अशी शक्यता आहे. आपल्या लढवय्या मुलाचे स्वागत करण्यासाठी अभिनंदन यांचे आई-वडीलही आतूर असून त्याच ओढीने ते दिल्ली गाठण्यासाठी घरून निघाले आहेत. आज रात्रीच चेन्नई विमानतळावरून दिल्लीसाठी आम्ही रवाना होत आहोत, अशी माहिती अभिनंदनचे वडील एअर मार्शल (निवृत्त) एस. वर्तमान यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, मदमबक्कम भागात अभिनंदन यांचे निवासस्थान असून त्यांचे आईवडील दिल्लीला जात असल्याची माहिती मिळताच तिथे मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली.