Samjhauta Express: पुढील सूचना येईपर्यंत भारताकडूनही “समझोता एक्स्प्रेस” धावणार नाही : रेल्वे

भारतानेही भारत-पाकिस्तान दरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे ३ मार्च रोजी समझोता एक्स्प्रेस धावणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत समझोता एक्स्प्रेस रद्द राहील, असेही नमूद करण्यात आले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेसमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारताच्या आधी पाकच्या बाजूने समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय झाला. तिथून ट्रेनच आलेली नसल्याने दिल्ली-अटारी दरम्यान ट्रेन चालवणे शक्य नाही. बुधवारी दिल्लीहून निघालेली समझोता एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी अटारी येथे पोहचली. तिथून पुढे ट्रेन जाऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांना पुढचा प्रवास बसमधून करावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीतून पुढची समझोता एक्स्प्रेस रविवार, ३ मार्च रोजी सुटणे अपेक्षित आहे. तोपर्यंत पाकने समझोता एक्स्प्रेस पुन्हा सुरू केली आणि तिथून ट्रेन भारतात आली तर भारतातूनही ट्रेन सोडली जाऊ शकते, असेही सूत्रांनी नमूद केले. दरम्यान, भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समझोता एक्स्प्रेसला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी दिल्लीतून रवाना झालेल्या समझोता एक्स्प्रेसमध्ये केवळ २७ प्रवासी होते. शिवाय जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात ६७० तर फेब्रुवारी महिन्यात या ट्रेनमधून अवघ्या ३७४ प्रवाशांनी प्रवास केला. ही ट्रेन दर बुधवारी आणि रविवारी दिल्लीतून रवाना होते.