Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Prasangik । स्मरण । Blog : संत कबीर : क्रांतिकारी समाजसुधारक

Spread the love

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, संत कबीर व ज्योतिबा फुले या तीन महामानवांना जाहीरपणे आपले गुरु मानले होते. संत कबीरांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. बाबासाहेबांचे कुटुंबच कबीरपंथी होते, त्यामुळे त्यांना लहानपणीच कबीर तत्वज्ञानाचे बाळकडू प्राप्त झालेले होते. ब्राह्मणवादास कट्टर विरोध हे या दोघांमधील साम्यस्थळ मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्माचा शोध बौद्ध धर्मापर्यंत येऊन संपला, इथपर्यंत बाबासाहेब कबीरांच्या माध्यमातून पोहोचले होते.


ज्या शक्तीने बाबासाहेबांना बुद्धाकडे नेले ती कबीरांची तर्कशक्ती होती. जे त्यांना कोणत्याही हिंदू संतात आढळून आली नाही. त्यांच्या निर्गुणवादानेच त्यांना नास्तिकतेकडे नेले. हे विधान एखाद्याला अविश्वसनीय वाटू शकते. पण ते वास्तव आहे. कबीरांनी जे तत्त्वज्ञान शिकवले ते बौद्ध परंपरेशी मिळतेजुळते होते. किंबहुना मध्ययुगीन बौद्ध व्यक्तींनी रचलेल्या काव्य रचनांच्या धर्तीवर त्यांनी आपले अनेक दोहे रचलेले आढळून येतात.

बाबासाहेब म्हणतात….

दिनांक २८ ऑकटोबर १९५४ रोजी पुरंदरे स्टेडियम मुंबई येथे आयोजित सभेत बोलताना बाबासाहेब म्हणतात, “माझे वडील कबीर पंथी होते त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीरला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले. मी मोठा कोणालाच म्हटले नाही. गांधीला मी महात्मा म्हटले नाही. कारण कबीरने म्हटले आहे मनुष्य होना कठीण है! तो साधू क्या बने! जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल?”

जगाच्या महासागरात अनेक रत्ने जन्माला आली. आपला भारत सुद्धा रत्नांनी ओतप्रोत भरलेला आहे. समाजसुधारक व कवी असलेले संत कबीर त्या महान रत्नांपैकी एक होते. संत कबीर हे प्रथम समाजसुधारक, नंतर कवी आणि भक्त होते. हिंदू-मुस्लिम हा भेदभाव दूर केला तरच समाज प्रबोधन होईल, असे त्यांचे म्हणणे होते. ते समाजात धार्मिक सलोखा आणि जातीय सलोखा प्रस्थापित करण्यावर अधिक भर देतात. पूजा, जप, तप, केस मुंडण, व्रत, उपवास, तीर्थयात्रा, मूर्तीपूजा इत्यादींना ते अनावश्यक मानतात. त्यांच्या मते हे सर्व दुष्ट माणसाच्या जीवन जगण्याच्या भ्रष्ट मार्गाचे माध्यम आहे.


कबीरांनी प्रेमाच्या भांडारातून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाज आणि धर्माच्या नावाखाली प्रचलित दांभिकता, अंधश्रद्धा, हिंसाचार आणि पशुबळी, मूर्तीपूजा इत्यादींना त्यांनी विरोध केला. कबीरांनी माणसाला जीवनात ज्ञान आणि काम सर्वाधिक महान असल्याचे सांगितले. ते त्यांच्या काळातील एक महान तत्त्वज्ञ होते. त्यांनी लिहिलेले दोहे आजच्या आधुनिक युगातही समर्पक व प्रासंगिक आहेत. संत कबीरांचे संपूर्ण साहित्य समाजाला आजही योग्य मार्ग दाखवून त्याचे पालन करण्याची प्रेरणा देते. कबीरांचा निर्गुणवाद बाहेरून दैवी वाटत असला, तरी आतून १०० टक्के स्वर्ग-नरक, परलोक, मुक्ती, पुनर्जन्मवाद, अवतारवाद, उपासना, तीर्थ, व्रत-उपास आणि शास्त्रवाद यांचे खंडन करणारा तो एकमेव निर्श्वरवाद आहे.

आयुष्यभर केली भ्रमंती …

कबीरदास यांचा जन्म इसवी सन १३९८ मध्ये काशी येथे झाला. कबीरांचा जन्म अशा वेळी भारतात झाला होता जेव्हा भारतीय समाज निराशेच्या गर्तेत आकंठ बुडाला होता. दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर सामाजिकदृष्ट्या, कबीराच्या काळात जाती, वर्ग आणि धर्म यांच्या भिंती भक्कम होत होत्या. धार्मिक चारित्र्याची आणि सांप्रदायिक श्रेष्ठत्वाची भावना शिगेला पोहोचली होती. त्यामुळे कर्मकांड, जातीयवाद इत्यादींमध्ये धार्मिक दिखाऊपणा प्रबळ झाला होता. अशा वेळी परस्पर वैमनस्यातून अस्वस्थ व कमकुवत झालेल्या समाजाला कबीरांनी प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. कबीरदास हे निर्भय समाजसुधारक होते. त्यांचे विचार आजही समाजाशी सुसंगत व उपयुक्त आहेत. कबीरदासांनी आयुष्यभर देशभर भ्रमंती केली आणि संतांच्या सहवासात राहून ज्ञान प्राप्त केले. ते शिकलेले नव्हते, तर दूरदूरच्या प्रदेशात प्रवास करून संतांच्या सहवासात बसून त्यांनी संपूर्ण धर्मांचा व समाजाचा सखोल अभ्यास केला होता. हा अनुभव त्यांनी काव्यातून लोकांना तोंडी सांगितला. त्यांच्या शिष्यांनी तो शब्दबद्ध केला.


कबीरांनी आंधळेपणाने कशाचेही अनुकरण केले नाही तर मानवी समाजाला नवे चैतन्य आणि नवजीवन दिले. त्यांनी आपल्या दोह्यांमधून लोकांचे डोळे उघडले आणि त्यांना मानवतेचे, नैतिकतेचे आणि नीतिमत्तेचे धडे दिले. क्रांतिकारी वाणीने त्यांनी आपल्या काळातील लोकांचे मन परिवर्तन केले. कबीर निर्गुणोपासक होते. त्यांच्या निर्गुणोपासकात ना मुसलमानांच्या एकेश्वरवादाला स्थान होते, ना हिंदूंच्या सगुणोपासनाला त्यांनी जातीपातीचे बंधन मानले, ते खरे मानव व मानवतावादी होते.
कबीरांच्या दोहे आणि तत्त्वांमध्ये नावीन्य असले तरी त्यात सुस्तपणा अजिबात नव्हता. त्यांची साधना जंगलांच्या आणि डोंगरांच्या गुहेमध्ये प्रकटणारी नव्हती, तर रोजच्या जगण्यात खांद्याला खांदा लावून चालणारी होती. कबीरांनी स्वत: कोणताही ग्रंथ रचला नाही, तर त्यांनी गायलेली वचने त्यांच्या शिष्यांनी गोळा करून ग्रंथाचे रूप देऊन त्याला बिजक नाव दिले. साखी, सबद, रमैनी असे त्यांचे तीन भाग आहेत.

कबीरांची वाणी प्रथम आदिग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये संकलित करण्यात आली होती. तिथून शोध सुरू झाला आणि अनेक दोहे सापडले. त्यांची भाषा सधुक्कड़ी किंवा खिचडी अशी आहे. आता लोक याला ब्रजभाषा मानतात. डॉ हजारीप्रसाद द्विवेदी यांनी त्यांच्या भाषेसंदर्भात म्हटले आहे की- “कबीरांचा भाषेवर प्रचंड अधिकार होता. ते वाणीचे हुकूमशहा होते. त्यांना जे काही व्यक्त करायचं होतं, त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.”

प्रेरणादायी दोहे…

कबीर दास यांची भाषा आणि शैली सोपी आणि सुंदर आहे जी अर्थ आणि महत्त्व यांनी ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या काव्यात सामाजिक भेदभाव आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात लोकांसाठी नेहमीच संदेश दिला जात असे. त्यांचे दोहे अतिशय नैसर्गिक वाटतात जे त्यांनी अंतःकरणापासून निर्मिलेली आहेत. अनेक प्रेरणादायी दोहे त्यांनी सोप्या शब्दांत मांडले होते. कबीर दास यांच्या एकूण ७० कलाकृती आढळून येतात, त्यामध्ये बहुतेक त्यांचे दोहे आणि गाण्यांचा संग्रह आहे. कबीर निर्गुण भक्तीला समर्पित होते. कबीर दास यांची जी काही काव्यनिर्मिती आहे, त्यापैकी त्यांचे प्रसिद्ध लेखन बिजक, कबीर ग्रंथावली, अनुराग सागर, सखी ग्रंथनाथ, सबदास, वसंत, सुकनिधन, मंगल, सखीस आणि पवित्र अग्नी इत्यादी आहेत.

कबीर दास यांचे प्रत्येक धर्माच्या व्यक्तीकडून कौतुक केले जाते आणि त्यांची शिकवण आजही नवीन पिढ्यांसाठी प्रासंगिक आणि उपयुक्त वाटते आहे. त्यांनी कधीही कोणत्याही धार्मिक भेदभावावर विश्वास ठेवला नव्हता. म्हणूनच इतक्या मोठ्या कृत्यांमुळे त्यांना संत ही पदवी त्यांचे गुरू रामानंद यांनी दिली असल्याचे बोलले जाते. कबीर हे मुळात सत्याच्या आचरणांचे समर्थक होते. त्यामुळे समाजसुधारणेच्या आड येणाऱ्या विकृतींच्या विरोधात त्यांनी फारसा गाजावाजा न करता विद्रोह व्यक्त केला, जो आजही आवश्यक वाटतो. कबीर जन्माने विद्रोही होते आणि त्यांनी धर्म-साधनेच्या सामाजिक रचनेत, मानवी आचरणातील सर्व ढोंग, निरर्थक कर्मे यांचा विरोध केला. कबीरच्या रूपात मानवी समाजाच्या एकात्मतेत, परस्पर प्रेमात आणि सुखासीन समाजजीवनात शतकानुशतके प्रकाश देणारा “प्रकाशस्तंभ” आपल्याला मिळाला आहे, ज्यामध्ये धर्म, वर्ण आणि जात असा भेद नाही, अशा समाजाच्या संरचनेत आणि मुख्य म्हणजे मानवी गुण असलेल्या व्यक्तीच्या समृद्धीत, हा पुढेही प्रकाश देत राहील.


कबीरदास यांच्या मते, जीवनपद्धती हा खरा धर्म आहे जो लोक जगतात. त्यांच्या मते कर्म म्हणजे उपासना आणि जबाबदारी म्हणजे धर्म होय. आपले जीवन जगा, जबाबदारी घ्या आणि आपले जीवन चिरंतन करण्यासाठी कठोर परिश्रम करा, आयुष्यात संन्यासीसारखे आपल्या जबाबदाऱ्यांपासून कधीही दूर जाऊ नका, असे ते म्हणत असत. जीवनाचा खरा अर्थ असलेल्या कौटुंबिक जीवनाचे त्यांनी कौतुक केले आहे आणि त्याला महत्त्वही दिले आहे. कबीरांवर हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही संस्कारांचा खोलवर प्रभाव पडला होता आणि रामानंद आणि त्यांच्या विचारांचाही प्रभाव होता. कबीरदास हे मुळात निर्भय स्वभावाचे होते. ते गृहस्थ होतेच, पण त्याचबरोबर ते संतही होते. हिंदी साहित्याच्या १५ व्या शतकातील ते एकमेव भारतीय कवी व संत होऊन भक्तियुगातील ज्ञानाश्रयी – निर्गुण शाखेच्या काव्यप्रवाहाचे प्रवर्तक बनले. त्यांनी आपल्या दोहे आणि कवितांनी संपूर्ण भारतीय जनमानसावर प्रभाव टाकला. इस्लामनुसार ‘कबीर’चा अर्थ महान असा होतो. कबीर पंथ हा एक विशाल धार्मिक समुदाय आहे ज्याने संत कबीरांना कबीर संप्रदायाचा प्रवर्तक म्हणून वर्णन केले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम संस्कारावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन्ही धर्म कबीर आमचा होता असा दावा करत होते. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे मोठेपण काय असू शकते ? त्यांच्या जीवनाचा इतिहास जगप्रसिद्ध असून आजही लोकांना खऱ्या मानवतेचे धडे देत आहे.

महान समाजसुधारक…

कबीरदास हे असे कवी होते जे एक संत, भक्त, समाजसुधारक सुद्धा होते. असा महात्मा आजपर्यंत कोणीही घडला नाही आणि कधीही होणार नाही. कबीर दास हे समाजसुधारक तसेच हिंदी साहित्यातील महान सामाजिक कवी होते. त्यांनी अनोख्या सत्यातून समाजाचे मार्गदर्शन व कल्याण केले, ज्याद्वारे माणूस दुराचार, कपट, निंदा, अहंकार, जातिभेद, धार्मिक दांभिकता इत्यादींना वगळून खरी मानव शक्ती बनू शकतो. समाजात चाललेल्या अंधश्रद्धा आणि रूढींवर त्यांनी जोरदार प्रहार केला. कबीर हे शांत जीवन जगत असत आणि त्यांनी अहिंसा, सत्य, सदाचार इत्यादींचा अंगीकार करून इतरांनाही शिकवले. समाजातील वाईट गोष्टी दूर करण्यासाठी कबीरदासांनी प्रेमाला प्राधान्य दिले. सामाजिक दुष्कृत्ये प्रेमातूनच दूर करता येतात. ज्यामध्ये प्रेम, दया, करुणा असते, तीच सर्वात मोठी पूजा असते. या संदर्भात ते म्हणतात,

“पोथी पढ़ी – पढ़ी जग मुआ पंडित भया न कोय।
ढाई आखर प्रेम का पढ़़े, सो पंडित होय।“

मोठमोठ्या पुस्तकांचे, पोथीचे ज्ञान असणारा खरा पंडित किंवा विद्वान असूच शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. माणसाने अहंकार सोडला पाहिजे आणि अहंकारी राहू नये, परंतु जर एखाद्या व्यक्तीने प्रेमाचे अडीच अक्षर देखील अनुसरले तर तो खरा अभ्यासू आणि चांगला पंडित होऊ शकतो एवढा प्रचंड आत्मविश्वास त्यांना होता.

संत कबीर हे जात-पात,उच्च-नीच यावर विश्वास ठेवत नव्हते. समाजात प्रचलित असलेल्या वर्णव्यवस्थेला ते विरोध करतात आणि मानवतेला महत्त्व देतात. कबीर म्हणतात की, जातिव्यवस्थेची कोणी पूजा करत नाही. आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत आणि एकाच देवाची लेकरे आहोत. साधुसंतांची जात महत्वाची नसून त्यांचे ज्ञान महत्वाचे असते असे सांगताना ते म्हणतात,

“जाँति न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान।
मोल करो तलवार का पड़ा रहने दो म्यान।”

संत कबीरांनी संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले, जगाला सुधारण्यासाठी ते नेहमीच नम्रता, करुणा आणि ज्ञान देतात. दयाळूपणा आणि नम्रतेपेक्षा जीवनात कोणताही मोठा गुण नाही. जर तुमच्याकडे खूप संपत्ती असेल, परंतु तुमच्याकडे नम्रतेची संपत्ती नसेल, तर तुम्हाला आदर सन्मान मिळू शकत नाही. कबीर जीवनात दया आणि नम्रतेचा संदेश आपल्या वाणीतून देतात. समाजाला नवी दिशा दाखवतात, ज्याद्वारे मनुष्य स्वार्थ, अहंकार, भेदभाव, ऐहिक आसक्ती आणि माया यांचा त्याग करून पवित्र आत्मा बनू शकतो, यावर भर दिला आहे. निंदा करणाऱ्या लोकांशी मैत्री ठेवू नये. ढोंगी लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे. असा सल्लाही ते देत असत. कबीरांना समाजाला सुधारलेल्या नव्या स्वरूपात पाहायचे होते.

डॉ. हजारी प्रसाद द्विवेदी यांनी त्यांच्या ‘कबीर’ या ग्रंथात संत कबिरांबद्दल उत्कृष्ट विवेचन केलेले आहे. ते असे, “कबीरदास अशा मिलन बिंदूवर उभे होते, जिथे एकीकडे हिंदुत्व बाहेर जात असे आणि दुसरीकडे मुस्लिम, जिथे एकीकडे ज्ञानाचा मार्ग निघतो, तर दुसरीकडे योगाचा मार्ग, जिथे एकीकडे निर्गुण भाव निघतो, तर दुसरीकडे सगुण साधना. अशा प्रशस्त चौकात ते उभे होते. तिथून ते दोघांनाही पाहू शकत होते आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांचे गुण-दोषही त्यांना स्पष्टपणे दिसत होते.”


आजकाल देशामध्ये केवळ राजकीय सत्ता संपादन करण्यासाठी हिंदू मुस्लिमांमधील सामंजस्य व बंधुत्व संपवण्याचे षड्यंत्र जातीय वर्चस्व जोपासणारे राजकीय पक्ष व संघटना रचण्यात धन्यता मानतात. कोणी भोंग्याचा वाद उकरून आपले अस्तित्व शोधतो आहे तर कोणी मशिदीत मंदिर असल्याचा बनाव करण्यात मश्गुल आहे. या सर्वानी एकदा कबीर मुळातून वाचण्याची आज खरी गरज आहे. संत कबीरांना ६२४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भीमराव सरवदे

औरंगाबाद, 9405466441

आपलं सरकार

Click to listen highlighted text!