Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : आज दिवसभरात : महाविकास आघाडीत भूकंप , सरकार जाणार कि , राहणार ?

Spread the love

ताज्या वृत्तानुसार सुरतमध्ये आज दिवसभर थांबलेल्या सर्व बंडखोर आमदारांना मध्यरात्री एअरलिफ्ट केले जाणार असल्याची माहिती असून त्यासाठी स्पाईसजेटचं विमान सुरतच्या एअरपोर्टवर दाखल झाले आहे. दरम्यान हाॅटेलमधून बाहेर पडताना दीपक केसरकरांना शिवसैनिकांनी अडवून मोठा राडा करण्याचा प्रयत्न केला. आता या आमदारांना संरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी अर्थातच त्यांना मदत करणारांनी घेतली आहे.


मुंबई : काल राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी घनघोर युद्ध झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे सेफ उमेदवार चंद्रकांत हंडोरे वगळता ठरल्याप्रमाणे काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना आणि भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांची , हंडोरे यांच्या पराभवाची आणि भाजपचे दहावे उमेदवार लाड यांच्या विजयाची चर्चा चालू होती. एकीकडे सर्व नेते  या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देण्यात मश्गुल होते तर दुसरीकडे ध्यानी मणी नसताना मतदानाचे आपले कर्तव्य ठरल्याप्रमाणे पार पाडून शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आपल्या स्नेही आमदारांना आणि सहयोगी पाच मंत्र्यांना घेऊन गजरातच्या दिशेने रातोरात प्रवास करीत कोणाच्याही  सुरतच्या ला मिरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले. आणि महाविकास आघाडीचे खास करून शिवसेनेचे धाबे दणाणले. आजचा संपूर्ण दिवस याच राजकीय चर्चेने उगवला आणि मावळलाही पण सरकारसमोरील अंधार अधिक काळा कुट्ट करूनच आजचा दिवस थांबला.


अर्थात याची कुणकुण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न लागती तरच नवल परंतु तोवर उशीर झाला होता. उद्धव ठाकरे यांनी रात्रीच फर्मान काढून सर्व आमदारांना वर्षावर उपस्थित राहण्यास सांगितले परंतु मीडियाच्या मते या बैठकीला जेम तें १५ आमदार उपस्थित होते परंतु पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले कि , या बैठकीला ३० आमदार उपस्थित होते. दरम्यान बैठकीला न आलेल्या आणि ते नेमके कुठे आहेत याचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसतानाच हे सर्व आमदार ५ मंत्र्यांसह शिवसेनेचे बंडखोर मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातच्या एका हॉटेलवर असल्याची माहिती मीडियावर झळकली.

संतप्त उद्धव ठाकरे यांनी घेतला हा मोठा निर्णय …

हि माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी सेनेची आणि पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन तडकाफडकी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करीत आमदार चौधरी यांच्या गळ्यात हि माळ घातली आणि एकनाथ शिंदे यांचा वेध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे खास दूत नॉर्वेकर आणि फाटक यांना सुरत दिशेने रवाना केले. ते तेथे पोहोचलेही परंतु एकनाथ शिंदे यांच्या परवानगीनंतरच ते शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू शकले. तेथे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे बोलणे करून दिले.

मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे काय बोलले ?

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी काही बोलण्याच्या आधीच जय महाराष्ट्र करीत आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. ते म्हणाले कि , साहेब , राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर असलेला संसार आता बस्स झाला. आता आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. भाजपसोबत सरकार बनविण्यातच आपले भले आहे.

तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो…

ते पुढे बोलते झाले कि , एकीकडे चर्चा करताय , दुसरीकडे अपहरणाचा आरोप करताय , तिसरीकडे मला गटनेटेपदावरून काढले… असे का केले? मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही,  मग गटनेते पदावर काढले ते का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतातत्. भूमिका मांडायची मग मुंबईत या असे  बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळे  का बोलतायेत ? हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजपा युती व्हावी हा आपला मुद्दा आहे. लवकरच आपली भूमिका जाहीर करू. या संवादात एकनाथ शिंदे यांनी शेवटी तुम्ही तुमचे  ठरवा, मी माझे  ठरवतो असे संतापून म्हणाले.

रश्मी ठाकरे यांच्याशी चर्चा …

यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशीही एकनाथ शिंदे यांनी संवाद साधल्याचे सांगण्यात येत आहे. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना शिंदे म्हणाले यांनी , आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून महाविकास आघाडीला सोडून भाजपसोबत सरकार बनवा असे ठामपणे सांगितले आणि हि चर्चा संपली.

भाजपच्या गोटात सावध प्रतिक्रिया …

या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना एकीकडे भाजपनेते याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही असे भासवून प्रतिक्रिया देताना दिसत होते तर दुसरीकडे या सर्व पार्श्वभूमीवर पुढील रणनिती ठरविण्यासाठी भाजपने नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे दिल्ली गाठून भाजप नेते अमित शहा , पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. आणि गुजरातच्या कराचीत थांबलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला कडक संरक्षण देत पाहुणचार देण्याचे औदार्य दाखवले. तिकडे जेपी नड्डा यांनी शिवसेनेच्या बागी आमदारांना आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी सुरतकडे कूच केले परंतु भाजपची आणि एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा झाली ? याचा तपशील अद्याप बाहेर आला नाही.

महाविकास आघाडीत अस्वस्थता …

सगळीकडे शिवसेनेच्या बंडाची चर्चा जोरावर असताना महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यात मोठी चर्चा झाली. आणि काँग्रेस , राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांशीही या मुद्द्यावरून चर्चा केली. दरम्यान या सर्व गदारोळात काँग्रेसचे पराभूत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची चर्चा बाजूला पडली. तर आपल्या विजयी उमेदवारांना अधिकची मते मिळाल्याचा राष्ट्रवादीच्या चेहऱ्यावरचा आनंदही फार काळ टिकला नाही.

शरद पवार यांची पत्रकार परिषद

दरम्यान तिकडे दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पावर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजकीय गदारोळाला आवाज देण्याचा प्रयत्न करीत हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे सांगितले. तर उद्या सरकार पडल्यानंतर तुम्ही भाजपसोबत जाऊन सरकार बनवणार का ? असे विचारले असता स्पष्टपणे नकार देत आम्ही विरोधी पक्षात बसू अशी कबुली दिली याचा अर्थ उद्या काय होऊ शकते याचा अंदाज शरद पवार यांनी वर्तविला असून येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची आपल्या पक्षही तयारी असल्याचेच एका अर्थाने सूचित केले.

बंड हा शिवसेनेतला प्रश्न : नाना पटोले

याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि , काँग्रेसचे सर्व ४४ आमदार मुंबईतच आहेत,जे संकट ओढावलंय त्यावर आमची बारीक नजर,काँग्रेसचा एकही आमदार नाॅट रिचेबल नाही,काँग्रेसचे सर्व आमदार संपर्कात,बंड हा शिवसेनेतला प्रश्न, शिवसेना तो प्रश्न चर्चेने सोडवेल,सरकार पाडापाडी आणि अग्निपथमुळे जनता रस्त्यावर उतरेल,कर्नाटक, मध्य प्रदेशचही सरकार भाजपने दबावाने पाडले ,आता महाराष्ट्र सरकार अस्थीरतेमागे ‘गुजरात’ कनेक्शन आहे.

शिवसेना अटी-शर्थींवर चालत नाही : संजय राऊत

या सर्व राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तोफ धडधडत असून शिवसेना अटी-शर्थींवर चालत नाही,असा थेट इशारा त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे. सुधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुरतला नेण्यात आलेले आमदार सुहास कांदे, प्रताप सरनाईक आणि  लता सोनावणे मुंबईत परतत आहेत तर एक आमदार पहाटेच वर्षावर पोहोचले आहेत.”

मुंबईत येऊन चर्चा करण्याचा शिंदे यांना सल्ला

एकनाथ शिंदे यांना सल्ला देताना राऊत म्हणाले कि , त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करावी. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. दरम्यान अनेक ९ आमदारांच्या कुटुंबीयांना पोलिसात तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.  हे असेच चालू राहिले तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल,” असा थेट इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!