Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन

Spread the love

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार श्री. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते येत्या १७ ऑगस्ट रोजी वयाची शंभरी पूर्ण करणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, व १ मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. निधनाचे वृत्त चिपळूण परिसरात समजताच अनेकांनी श्रद्धांजली वाहीली.

अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे गोरेपान दलवाईसाहेब हे पहाता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. गेली सुमारे वीसबावीस वर्षे ते राजकारणापासून दूर होते. पण राजकारणी माणसांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. ते कट्टर काँग्रेसवासी होते, तरीही विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन असत.

त्यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो. कारण पत्रकारिता आणि राजकारणातील आताच्या पिढीला माहित आहेत ते दुसरे हुसेन दलवाई. त्यांना ज्युनियर हुसेन दलवाई असे म्हटले जाते. सीनियर दलवाई हे उक्ताडचे म्हणजे चिपळूण शहराच्या हद्दीतील शेवटच्या टोकाचे रहिवासी!

पै. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर १९६२पासून निवडून येत. जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये, वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाईसाहेब चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत व दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचं नातं ठेवीत. खेड आणि चिपळूणच्या दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते, ती दलवाईसाहेबांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाईसाहेबांनीच मंजूर करून घेतला आणि तालुक्याचा बराच भाग सुजलाम झाला. खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाईसाहेबांच्याच काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत. सुदैवाने त्यानंतर आमदार झालेले कै. तु.बा.कदम यांनी तेवढ्याच तळमळीने धरणांची अपुरी पूर्ण करून घेतली.

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाईसाहेबांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत. श्री. शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकररावांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाईसाहेबांना मंत्री केले. त्यानंतर बॅ.अ.र.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्यावेळी दलवाईसाहेब राज्यसभेवर निवडून गेले व नंतर स्वेच्छेने निवृत्त झाले.

पै. दलवाईसाहेबांचे मुंबई आणि दिल्लीतील घर म्हणजे कोकणातील कार्यकर्त्यांना मोठा आधार होता. कोणीही आले तरी त्याचे उत्तम आदरातिथ्य आणि शक्य ती सर्व मदत हे अखंडपणे चालू असे. येणाऱ्या सर्वांना चहापाणी, कधी जेवणाचा आग्रह होई, प्रत्येकाच्या कामासाठी फोन, चिट्टी व काहीवेळा समक्ष बरोबर घेऊन जाऊन काम करून द्यायचे हे दलवाईसाहेबांचे खास वैशिठ्य! त्यांच्या पत्नी किंवा घरातील मंडळी या गर्दीला कधी कंटाळल्या नाहीत. काही काळासाठी दलवाईसाहेबांनी महाराष्ट्राच्या अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तेथेही कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ असे. त्याच सुमारास ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यरत झाले. रोज सकाळी तीन तास ते प्रतिष्ठानमध्ये काम करीत असत.

दलवाईसहोबांच्या वडिलांनी चिपळूण नगरपालिकेतील एका पोटनिवडणुकीत विजय मिळवून समाजसेवेची सुरुवात केली. दलवाईसाहेबांनी ते काम पुढे अखंडपणे करीत नेले. आयुष्यभर स्वच्छ चारित्र्याने समाजात व राजकारणात अखंडपणे काम करणारे दलवाईसाहेब त्यांची प्रकृती सांभाळून अधूनमधून फोन करून प्रत्येक परिचिताची ख्यालीखुशाली विचारत असत. दलवाईसाहेबांच्या निधनामुळे कोकणाच्या विकासासाठी योगदान देणारा एक नि:स्वार्थी, सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करणारा सच्चा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

कुमार कदम,

मुख्य संपादक, महावृत्त,
माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

आपलं सरकार

Click to listen highlighted text!