Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkrainWarUpdate : उत्तर कोरियाची रशिया -युक्रेन वादात उडी , बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन सांगितले युद्धाचे कारण…

Spread the love

सेऊल : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियानेही या वादात उडी घेत रशियाचे समर्थन करीत त्यांनी रविवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. यामुळे अमेरिकाही अलर्ट मोडवर आली आहे. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान जवळपास महिनाभर शांतता राखल्यानंतर उत्तर कोरियाने पुन्हा लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.


विशेष म्हणजे युक्रेनची राजधानी कीववर रशियाचा हल्ला सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. रशियाच्या या कारवाईमुळे पाश्चात्य देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यावरील निर्बंधांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने रविवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागून अमेरिकेला लक्ष्य करून म्हटले आहे कि , युक्रेन संकटाचे खरे मूळ अमेरिका आहे.

दरम्यान उघडपणे रशियाची बाजू घेत युक्रेनवरील कारवाई योग्य असल्याचे नमूद करून या विनाशकारी परिस्थितीला अमेरिकाच जबाबदार असल्याचे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे. रशियाच्या सुरक्षेच्या चिंतेकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने आपल्या लष्करी महासत्तेवर भर दिला आहे. या विधानासोबत सोसायटी फॉर इंटरनॅशनल पॉलिटिक्स स्टडी इन नॉर्थ कोरियाचे संशोधक री जी सॉन्ग यांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले, युक्रेनच्या संकटामागे अमेरिकेची मनमानी वृत्ती आणि कट्टरता जबाबदार आहे.

सॉन्गने अमेरिकेवर दुटप्पी मापदंड अवलंबल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, अमेरिका शांतता आणि स्थैर्याच्या नावाखाली इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असते, पण स्वत:च्या सुरक्षेसाठी राष्ट्रहितासाठी कोणी पाऊल उचलले तर त्याचा राग येतो. पण ते दिवस गेले, जेव्हा अमेरिकेने सर्व काही ठरवण्यासाठी आपले वर्चस्व वापरले. ते म्हणाले की जर तुम्ही मजबूत नसाल तर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान चीनशिवाय रशियासह काही देश उत्तर कोरियाला सतत मदत करत आहेत. रशिया मानवतावादी कारणांचा हवाला देत अण्वस्त्रधारी उत्तर कोरियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध कमी करण्याचा सल्ला देत आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!