Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खेरी प्रकरणात अखेर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या पुत्राला पोलिसांनी टाकले गजाआड

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना भरधाव गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपावरून अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तपासात सहकार्य करत नसल्याने व गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी आशिष याच्यावर अटकेची कारवाई केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.दरम्यान या प्रकरणात न्यायालयानेही उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते.

याविषयी माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे कि , लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी आज सकाळी ११ वाजल्यापासून मिश्रा याची चौकशी करण्यात येत होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी १२ तासांनंतर पुढचे पाऊल उचलत आशिष मिश्रा याला अटक केली आहे. लखीमपूर खेरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. ‘आरोपीची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली. त्यात आरोपी सहकार्य करायला तयार नाही. पोलिसांच्या काही प्रश्नांना आरोपी प्रतिसाद देत नसल्याने व दाखल गुन्हा गंभीर असल्याने अटक करण्यात आली आहे’, असे अग्रवाल यांनी सांगितले. आशिष याला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

असे आहेत आरोप

दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९ (दंगलीशी संबंधित कलमे), २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३३८ (जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने एखाद्याला इजा करणे), ३०४ अ, ३०२ (हत्या), आणि १२० ब ( गुन्हेगारी कट रचणे ) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आशिष याच्या अटकेसाठी विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांचा मोठा दबाव होता.

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. येथे चार शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्यात आले होते. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा बळी गेला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून सर्व मृतांच्या वारसांना ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली आहे तर कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!