Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : “क्रूझ ” कारवाईवर प्रश्नचिन्ह , एनसीबीने सर्व आरोप फेटाळले !! काय आहे हे प्रकरण ?

Spread the love

मुंबई : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई सध्या रोज गाजत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या या कारवाईवर  प्रश्नचिन्ह उपस्थित करून हि छापामारी बनावट असल्याचा आरोप केला.  मलिक म्हणाले कि , गेल्या काही दिवसांपासून क्राइम रिपोर्टरना एक मेसेज सर्क्युलेट केला जात होता. तो म्हणजे पुढचे लक्ष्य शाहरूख खान असणार आहे. पत्रकारांना ही माहिती आहे आणि गेल्या एक महिन्यापासून ही माहिती सर्क्युलेट केली जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी या बनावट कारवाईमागे भारतीय जनता पक्ष असल्याचा गंभीर आरोप करतानाच मलिक यांनी एनसीबीवर देखील ताशेरे ओढले आहेत. अँटी नार्कोटीक्स सेल देखीलच सतत कारवाई करत असते, अनेकांवर गुन्हे दाखल करत असते. अनेकांच्या चौकशा केल्या जातात. पण तिथे कधी प्रसिद्धीचे काम केले गेले नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीच्या व्यतिरिक्त एनसीबीचे कोणतेही काम नाही

दरम्यान आंतरराज्यीय प्रकरणांवर लक्ष देणे, आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड करणे ही कामे खरेतर एनसीबीने करणे अपेक्षित आहे. मात्र, एनसीबीने कधीही आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड करण्याचे काम केलेले नाही. काही लोक, चित्रपट क्षेत्रातील लोक ड्रगचे सेवन करत असतीलही, पण ते ग्राहक आहेत. अशा फिल्मसिटीतील ग्राहकांना पकडले जाते आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली जाते. मात्र, अशी प्रकरणे असतील तर एनसीबीने अशी स्थानिक प्रकरणे अँटी नार्कोटिक्स सेलकडे सोपवली पाहिजे होती. आंतरराज्यीय रॅकेट देखील एनसीबीने उघड केलेले नाही. मात्र प्रसिद्धीच्या व्यतिरिक्त एनसीबीचे कोणतेही काम नाही. अँटी नार्कोटिक्स सेलने जी प्रकरणे गेल्या २ वर्षांमध्ये हाताळली आहेत त्यांची माहिती मी प्रसारमाध्यमांना देण्यास सांगणार आहे, असेही मलिक म्हणाले.

एनसीबीने सर्व आरोप फेटाळले

दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाईवर मंत्री नवाब मलिक यांनी संशय घेऊन व्यक्त केलेले सर्व आरोप  एनसीबी अधिकाऱ्यांनी तातडीने फेटाळले आहेत. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच ही कारवाई केली आहे. क्रूझवरील पार्टीतून ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्यांनी नमूद केले. मलिक यांनी ज्या दोन व्यक्तींची नावे घेतली होती ते दोघेही या कारवाईत साक्षीदार असल्याचे नमूद करताना त्यात काहीही गैर नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे कार्यकर्ते कारवाईत कसे ?

‘मुंबईत एनसीबीच्या कारवाई दरम्यान ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत तो  के. पी. गोसावी आणि  अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाइल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. क्रूझवर ड्रग्ज सापडलं तर मग फोटो एनसीबी कार्यालयात का काढले, असा सवालही मलिक यांनी विचारला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असताना एनसीबीने तातडीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले आहे व सर्व आरोप फेटाळले आहेत.

कारवाईवर कुणाला शंका असल्यास ते कोर्टात जाऊ शकता….

नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तरे देताना एनसीबीचे हे अधिकारी म्हणाले कि , ‘ एनसीबीच्या कारवाईबाबत जे आरोप करण्यात आले आहेत ते निराधार आहेत. आम्हाला जी खबर मिळाली होती त्याआधारेच आमच्या टीमने क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत क्रूझवरून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून ड्रग्ज आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात आली. आमचा तपास अजूनही सुरू आहे’, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. कारवाईवर कुणाला शंका असल्यास ते कोर्टात जाऊ शकता. आम्ही तिथे आमचे म्हणणे मांडू, असेही सिंह यांनी नमूद केले. भाजप पदाधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीचा कारवाईत सहभाग होता, असा मलिक यांचा आरोप होता तोही सिंह यांनी फेटाळला. ही जी नावे घेण्यात आली आहेत ते साक्षीदार होते. त्यांच्यासह आणखीही काही व्यक्ती होत्या. तशी तरतूद कायद्यात आहे. त्यात काहीही गैर नाही, असे सिंह म्हणाले.

आर्यन खान चौकशीच्या केंद्रस्थानी

आर्यन खान आणि त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आर्यन खान आणि त्याच्यासह इतरांच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह व्हॉट्अॅप चॅट मिळाले होते. त्यावरून या सर्वांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध आल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार या सर्व प्रकरणात  एनसीबीने अधिक सखोलपणे करायला सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून आर्यनचा मोबाईल एनसीबीने फॉरेन्सिक तपासणीसाठी गांधी नगर येथील एका लॅबमध्ये पाठवला आहे. याप्रकरणी आता एनसीबीने आणखी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. यातील चारजण दिल्लीतील क्रे एक्सपीरियंन्स प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी संबंधित आहे. आतापर्यंत याप्रकरणी एनसीबीने १६ जणांना ताब्यात घेतले आहे.

एनसीबीवरील सर्व आरोपांची चौकशी व्हावी

दरम्यान मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया या क्रूझवरील रेव्ह पार्टीवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर  काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कोणतही ड्रग्ज सापडलेले  नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. सचिन सावंत यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. एनसीबी व भाजपमधील संगनमताची महाविकास आघाडी सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

‘खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर “पोलीस” पाटी कशी? एनसीबीने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?,’ असे प्रश्न सचिन सावंत यांनी विचारले आहेत. ‘मुंद्रा पोर्ट ड्रगसाठा प्रकरणातून लक्ष हटवणे हे लक्ष्य होते का? गोव्यात, सँडलवूड ड्रग रॅकेट व सुशांत सिंह प्रकरणात भाजपचे ड्रग कनेक्शन पाहिले आहे. देशाविरुद्ध हे गंभीर षडयंत्र आहे. तरुण पिढीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांचे आरोप गंभीर आहेत, चौकशी झाली पाहिजे,’ असेही सचिन सावंत यांनी म्हटले  आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!