Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : कोकण , माराठवाडा , विदर्भात पावसाची धूम , मराठवाड्यातील धरणांची स्थिती अशी आहे…

Spread the love

मुंबई : राज्यत सर्वत्र पावसाची बॅटिंग चालू असून कोकणवासीयांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात ४७५ मिमी पाऊस झाला आहे. कोकणाबरोबरच मराठवाड्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून धरणे भरली आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.

दरम्यान विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे २ ते ३ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठवाड्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक लहान मोठी धरणं भरली आहेत. तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीडमध्ये पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून ४ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके वाहून गेली आहेत. दरम्यान गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्गही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले नद्याना पुर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण शंभर टक्के भरले आहे.

मराठवाड्यातील बहुतांश धरणे भरली

मराठवाड्यातील दुधना, माजलगाव, बिंदुसरा, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, मनार ही धरणं पूर्णतः भरली असून इसापूर आणि येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लहान मध्यम प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेत. लातूरची तहान भागावणा-या मांजरा प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा झाल्यानं लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे . जायकवाडी धरण मात्र अजूनही भरण्याच्या प्रतीक्षेत आहे, धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे.

मराठवाड्यानंतर विदर्भात चांगला पाऊस कोसळत आहे. नागपुरात पावसाचा जोर वाढला आहे. शहरात अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढच्या २४ तासात नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून ते पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.
नांदेडमधील विष्णूपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं, प्रकल्पाचे ७ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. सध्या २ हजार ४३६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!