Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Spread the love

पुणे : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले होते.

बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

बालाजी तांबे यांची ज्ञान संपदा
– आत्मरामायण (गुजराती भाषेत)
– आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
– आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
– आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
– चक्र सुदर्शन (मराठी)
– मंत्र आरोग्याचा
– मंत्र जीवनाचा
– वातव्याधी
– श्री गीता योग – शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
– श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
– संतुलन क्रियायोग (मराठी)
– स्त्रीआरोग्य
– स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!