Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे राज्यात पुन्हा नवे निर्बंध , जाणून घ्या काय आहेत नियम ?

Spread the love

सर्वच जिल्हे तिसऱ्या गटात । दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहार राहतील सुरु । शनिवार रविवार लोकडाऊन


मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.


राज्य शासनाने आपल्या नवीन आदेशात म्हटले आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकते . लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकाने  आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापनं सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

असे आहेत निर्बंध

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले यातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.

जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. राज्यात गुरुवारी कोविड १९ चे १० हजाराहून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे २१ रुग्ण असून त्यातील एक दगावला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 चा प्रसार होणार नाही याची काळजी घेत नागरीकांना बंधने सुकर होणे सुनिश्चित करण्याबरोबरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी खालील विशेष कृती करू शकतील.

असे आहेत नवे नियम

१. लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.
२. कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.
३. कोव्हिडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करावे.
४. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्यात.
कोविडरोधक वर्तणूक न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.
५. गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.
६. न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोट्या क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.
७. विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून CAB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत. CAB चे नियम हे बंधने कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. हे सामाजिक पातळीवर पाळायचे नियम आहेत. सदर नियमांचे पालन न केल्यास नागरीकांना दंड होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!