Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शिवसेनेशी हातमिळवणी करणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचे निलंबन

Spread the love

औरंगाबाद |  जळगाव महानगरपालिका महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या एआयएमआयएमच्या तीन नगरसेवकांसह जळगावच्या जिल्हाध्यक्षांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून या तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. २१ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या कार्यालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशही एआयएमआयएम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी दिले आहेत.

डॉ. कादरी यांनी आज कारवाईचे आदेश काढले आहेत. या आदेशामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिया अहेमद अब्दुल करिम बागवान यांच्यासह महानगर पालिकेतील एमआयएम नगरसेवक रियाज अहमद अब्दुल करिम बागवान, सईदा युसूफ शेख, सुना राजू देशमुख या तीन नगरसेवकांनाही निलंबित करण्यात आले आहे. ‘जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्ट झालेले आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची महाविकास आघाडी आहे. भाजपापासून जेवढं एमआयएम पक्ष लांब आहे. तितकेच अंतर सत्ताधारी आघाडीसोबत पक्षाने आतापर्यंत कायम ठेवले आहे’, असे नमूद करत ही कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव महानगर पालिकेत शिवसेनेला मतदान करण्याच्या प्रक्रियेत संबंधित नगरसेवकांसह तेथील जिल्हाध्यक्षही सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पक्षासोबत असलेल्या आणि पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांच्या विरोधात या नगरसेवकांनी मतदान केले आहे. म्हणून पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे या तिन्ही नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गफ्फार कादरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.

दरम्यान यापूर्वी अमरावतीच्या नगरसेवकांनीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षासोबत हातमिळवणी केली होती. याबाबतही अमरावतीच्या नगरसेवकांना नोटीस देण्यात आली असून त्याच्यावरही कारवाई सुरू असल्याची माहिती एमआयएम शहर अध्यक्ष शारेख नक्षबंदी यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!