Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#HSC_SSC_Exams_2021: सोशल मीडियावरील ‘या’ व्हायरल पोस्टवर विश्वास ठेऊ नका

Spread the love

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालक व विद्यार्थ्यांकडून दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून 16 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे.

सोशल मदियावरील व्हायरल वेळापत्रकांवर विश्वास ठेऊ नका

संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून छापील स्वरुपात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील पत्रकावरून परीक्षांच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे अन्य संकेतस्थळावर आणि अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या 

तसेच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीवर संवाद साधताना सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल होता तेव्हा पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नव्हती. अशा वेळी आपण मागच्या वर्षी जो निर्णय घेतला होता तसाच निर्णय यंदा विचार करुन घ्या लागेल. मागच्या वर्षी बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचे काही पेपर झाले होते. यंदाही आपल्याला यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. विद्यार्थी आणि पालक याबाबत खूप चिंतेत आहेत हे मला मान्य आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे परीक्षांचे टेंशन आहे. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आवश्यक आहे कारण, ही मुलं पुढे अकरावीला अॅडमिशन घेणार आहेत. बारावीची मुलं प्रोफेशनल कोर्ससाठी अॅडमिशन घेतील, अशावेळी त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. तसेच या परीक्षा ऑनलाईन घेता येणार नाहीत असे दहावी आणि बारावी बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे या परीक्षा आम्हाला ऑफलाईनच घ्याव्या लागणार आहे. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असताना विद्यार्थ्याच्या दृष्टीने भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल त्याला कसे सामोरे गेले पाहिजे याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु दुर्दैवाने चॅनलच्या माध्यमातून अशी बातमी समोर आली की दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर असा कोणताही निर्णय झालेला नाही. तामिळनाडूचा निर्णयही आम्ही तपासून पाहत आहोत. पहिली ते आठवीचा, नववी आणि अकरावीचा काय निर्णय घेतला पाहिजे याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध यंत्रणांकडून मत मागवत आहोत. तसेच दहावी आणि बारावीच्या बाबतीत मी आधीच सांगितले आहे की या परीक्षा घेणे आम्हाला भाग आहे,” असेही वर्षा गायकवाड एका वृत्तवाहिनीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!