Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoojaChauhanCase : हत्या नाही हा केवळ आत्महत्येचाच प्रकार : धनंजय मुंडे

Spread the love

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून हा केवळ आत्महत्येचाच प्रकार असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे. तसेच, हे सरकार गुन्हेकगारांना पाठीशी घालणारे आहे असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

हत्या नाही आत्महत्येचा प्रकार : धनंजय मुंडे

पूजा चव्हाणची हत्या नाही तर तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे, असे धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. एकदा सगळे काही स्पष्ट झाले की त्यावर अधिक बोलता येईल, असेही मुंडे म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनासुद्धा एका प्रकरणात लक्ष्य करण्यात आले होते. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे घेतली आणि ते प्रकरण बंद झाले. या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण प्रकरणात सत्य समोर आल्यानंतरच बोलायला हवे अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली.

गुन्‍हेगारांना पाठीशी घालणारं सरकार : राधाकृष्ण विखे पाटील

दरम्यान, संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘पूजा चव्‍हाण मृत्‍यू प्रकरणातील सत्‍य बाहेर आले पाहिजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्‍हाच दाखल केलेला नाही, मग सत्‍य बाहेर कसे येणार? या प्रकरणात गुंतलेल्‍या डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ केले पाहिजे. मात्र, या घटनेचे गांभीर्य सरकारने अद्यापही दाखविलेले नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजुनही गायब आहेत. या घटनेतील सत्‍यता समोर यावी असे महाविकास आघाडीच्‍या सर्व नेत्‍यांना वाटत असेल तर, अद्याप गुन्‍हा दाखल का झाला नाही. गुन्हा दाखल होऊन तपास केल्याशिवाय सत्य कसे बाहेर येणार,’ असा सवाल करून विखे पाटील यांनी पूर्वीच्या एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘मागील वेळीसुध्‍दा मंत्रिमंडळातील राष्‍ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेमध्‍ये अडकले होते. त्यानंतर पुढे काय झाले हे संपूर्ण राज्‍याने पाहिले आहे. त्‍यामुळे गुन्‍हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे, हाच संदेश राज्‍यात जातोय. याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले पाहिजे. असा आरोप करून अशा घटनेतील डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करण्‍यात यावे,’ अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस महासंचालकांचे सखोल चौकशीचे आदेश

बीडमधील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असतानाच काही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट आरोप केले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणखी कशाची वाट पाहत आहेत. ताबडतोब राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी मागणीही वाघ यांनी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने काळजीपूर्वक पावले टाकली जाणार आहेत. या प्रकरणात चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तशीच भूमिका मांडली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!