Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राजधानीतील मुख्य सोहळा संपताच सुरु होत आहे शेतकऱ्यांची ‘ट्रॅक्टर रॅली’

Spread the love

एका बाजूला राजधानी दिल्लीत देशात ७२ व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर परेड पार पडल्यानंतर दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून ‘टॅक्टर रॅली’ काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच १ फेब्रुवारी रोजी ‘अर्थसंकल्पीय दिवस’ निमित्तानंही शेतकरी संसदेपर्यंत ‘पदयात्रा’ काढण्याची तयारी करीत आहेत.


दरम्यान कायदा सुव्यवस्था लक्षात घेता सदर ट्रॅक्टर रॅली मध्य दिल्लीमध्ये प्रवेश करणार नाही. प्रजासत्ताक दिनाची परेड संपुष्टात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होईल, असे आश्वासन शेतकरी संघटनांनी दिले आहे. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये जवळपास दोन लाख ट्रॅक्टर्सचा सहभाग होत असल्याची शक्यता आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर या सीमांहून ही ट्रॅक्टर रॅली आगेकूच करणार आहे.

सदर  ट्रॅक्टर रॅली निघण्यापूर्वीच सिंघू सीमेवर पोलिसांनी उभारलेले बॅरिकडेस् शेतकऱ्यांनी तोडले आहेत. पन्नू समूहाच्या जवळपास ५००० शेतकऱ्यांनी आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान  राजधानीकडे निघालेल्या वाहनांना रोखण्यासाठी करनाल बायपासवर मंगळवारी रात्रीतून  एक मोठी तात्पुरती भिंत उभारण्यात आली आहे.

या . ‘ट्रॅक्टर रॅली’त सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सकाळपासूनच शेतकरी मोठ्या संख्येने  आपापल्या ट्रॅक्टरसहीत राजधानीकडे कूच करीत आहेत. सोमवारी, किसान मजूर संघर्ष समितीने  संयुक्त किसान मोर्च आणि पोलिसांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड मार्गावर आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. आपण दिल्लीच्या रिंग रोडवरही जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीमेवर तीन ठिकाणी मार्ग बंद

दरम्यान पोलिसांकडून शेतकरी संघटनांशी झालेल्या अनेक बैठकांनंतर सीमेवर तीन ठिकाणी मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांकडून वाहतुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात वाहनचालकांना नॅशनल हायवे ४४, सिंघू तसंच टिकरी सीमा भागापासून लांब राहण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाझीपूर सीमा, राष्ट्रीय महामार्ग २४, रस्ता क्रमांक ५६ आणि अप्सरा सीमेवर जाणाऱ्या रस्तेही टाळावेत, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे. शेतकरी संघटनांची ही ट्रॅक्टर रॅली दुपारी सुरू होऊन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहील असे सांगण्यात येत आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.

आठवडय़ाभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!