MaharashtraNewsUpdate : अभिव्यक्ती : कळीचा मुद्दा : नामांतर नव्हे तर या शहराचा ” संभाजीनगर -औरंगाबाद ” असा नामविस्तार व्हावा…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबादचे नामांतर भाजप -सेना आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. मुळात हे जगजाहीर आहे कि महाविकास आघाडीचे सरकार हे भाजप -सेनेच्या अतिप्रसंगातून जन्माला आलेले सरकार आहे. सरकार कसले हा प्रासंगिक करार आहे. पाच वर्षासाठी तीन पक्षांनी मिळून केलेला. सांगितले जात होते कि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील भाजपची मैत्री हि नैसर्गिक मैत्री आहे पण राजकारणात नैसर्गिक -अनैसर्गिक असे काहीही नसते. वर्तमानाच्या भाषेत राजकारणाची  व्याख्या  करायची  झाली तर राजकारण हि संधी साधून करायचा खेळ आहे. याशिवाय दुसरे काहीही नाही.


खरे तर भाजपच्या बाबतीत ” संभाजीनगर ” चा विषय म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले असा आहे. गेल्या पाच वर्षात आपला मुख्यमंत्री असताना आणि औरंगाबाद महापालिकेत सत्ता असताना भाजप असो कि सेना या दोघांनीही या मुद्यावर कधीही भाष्य केले नाही पण लोकार्थाने शिवसेना नेहमीच औरंगाबादचा उल्लेख ” संभाजीनगर ” असाच करीत राहिली आहे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि आताही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. त्यामुळे त्यांच्या ट्विटमध्ये नवीन काहीच नाही. याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “सामाना”तून भाजपला दिलेले उत्तर अगदीच समर्पक आहे. त्यामुळे या विषयाला भाजपने अधिक हवा घालण्याची गरज नाही.

Advertisements

वातावरण खराब करण्याचा हा त्यांचा कार्यक्रम

मुळात संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः लाखो लोकांच्या उपस्थितीत औरंगाबादचे नामांतर जाहीरपणाने “संभाजीनगर ” असे केले आहे आणि तेंव्हापासून साध्या शिवसैनिकापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच नेते कार्यकर्ते औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. खरे तर मुख्यमंत्री म्हणून घटनात्मक पदावर बसूनही जेंव्हा जेंव्हा त्यांच्या भाषणात औरंगाबादचा उल्लेख येईल तेंव्हा तेंव्हा उद्धव ठाकरे यांनी ” औरंगाबाद -संभाजीनगर ” असाच उल्लेख केलेला आहे आणि औरंगाबादकर जनतेला हे चांगले माहित आहे त्यामुळे ” औरंगाबाद -संभाजीनगर ” हे दोन्हीही शब्द या शहरात प्रचलित आहेत. हे भाजपला माहित नाही काय ? तर माहित आहे परंतु काही तरी करून भावनिक इश्यू निर्माण करायचा आणि होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत हवा सोडून वातावरण खराब करण्याचा हा त्यांचा कार्यक्रम जनता ओळखून आहे. त्यामुळे तसा या राजकारणाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.

Advertisements
Advertisements

छाती फाडून भाजपला ” राम दाखवला “

भाजपने कोरोनाच्या काळातही मंदिराच्या मुद्द्यावरून वातावरण पेटवण्याचा आणि त्याचा शेक घेण्याचा कार्यक्रम केला खरा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शिताफीने आपल्याला पाहिजे तेंव्हाच मंदिराची दारे उघडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजप -सेनेत चांगलीच तू -तू -मै -मै होताना दिसते. पण या मुद्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला पुरून उरले. त्यांनी थेट विधानसभेतच हनुमानासारखी छाती फाडून भाजपला ” राम दाखवला ” तरीही भाजपचे हिंदुत्वाचे तुणतुणे चालूच आहे.

खरे तर मुळात संपूर्ण देशच बहुसंख्यांक हिंदूंचा देश आहे.

या अर्थाने केवळ भाजप हिंदू पुढाऱ्यांचा पक्ष आहे मग काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना देशाच्या विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कार्यकर्ते हिंदू नव्हेत तर कोण आहेत ? किती हा बोलघेवडेपणा ? ” वंदे  मातरम , जय श्रीराम , राम-राम , भगवा ध्वज ” या शब्दांचे “कॉपी राईट ” काय भाजपने काढून ठेवले आहेत कि काय ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. वास्तविक पाहता प्रत्येक पक्षात असलेला , नसलेला प्रत्येक माणूस या सगळ्या शब्दांचा वापर करतो आणि करू शकतो पण या सर्व शब्दांचा वापर भाजप आपल्या राजकारणासाठी ” शस्त्र ” म्हणून उपयोग करतो. पण लोकांना याची जाणीव नसते असे कोणीही समजू नये.

खडकी आणि देवगिरी प्रांत

स्पष्टच सांगायचे झाले तर आधी म्हटल्याप्रमाणे  ” संभाजीनगर ” हे नावच ज्या शिवसेनेने केवळ दिलेच नाही तर या शहराचे नाव घेताना ते याच नावाने औरंगाबादचा उल्लेख करतात त्यामुळे त्यांना औरंगाबादच्या नामांतराची आठवण करून देणे म्हणजे सूर्याला आरसा दाखविण्यासारखे आहे. कारण भाजप आणि संघाच्या दप्तरात औरंगाबादचे नाव ” संभाजीनगर ” कुठेही नाही , ते औरंगाबादचा उल्लेख त्यांच्या कार्यक्रमात ” “खडकी ” किंवा ” देवगिरी प्रांत ” असा करतात . त्यामुळे त्यांची हि केवळ राजकीय खेळी आहे हे उघड आहे .

राहता राहिला प्रश्न औरंगाबादच्या नामांतराचा आणि महाविकास आघाडीचा तर  एकूणच भाजपच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सेना आणि काँग्रेस -राष्ट्रवादीच्या भूमिका स्पष्ट आणि जगजाहीर आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून तर या तिघांमध्ये लावून देता येईल का ? यावर चिंतन करणे भाजपला शोभणारे नाही असेही नाही पण या वादात औरंगाबादकरांना आणि संभाजीनगरवासियांना भावनिक बनवून विकासापासून  भटकवणे आणि आपला राजकीय उल्लू सिधा करणे हा जर कुणाचा हेतू असेल तर तर तो या मुद्यावर सध्या होणार नाही याही खबरदारी शहरवासीयांनी घेण्याची गरज आहे. तात्पर्य काय तर या शहराचा  मुख्यमंत्र्यांनी केलेला  ” संभाजीनगर – औरंगाबाद ”  हा नामविस्तारच  योग्य आहे.

बाबा गाडे  । ” संभाजीनगर – औरंगाबाद “

 

आपलं सरकार