Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : मोठी बातमी : राज्याच्या महापालिका क्षेत्रात उद्यापासून संचारबंदी , नव्या कोरोना व्हायरसचा परिणाम

Spread the love

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा करोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी करोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाइन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमानप्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!