Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AhmadnagarNewsUpdate : धक्कादायक : रेखा जरे खून प्रकरणात पत्रकारानेच सुपारी दिल्याची माहिती

Spread the love

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या रेखा जरे खून  प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे असे या सूत्रधाराचे नाव असून, आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान बोठे फरारी असून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घराची झडती घेतली असून, काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.


‘ यशस्विनी महिला ब्रिगेड ‘च्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या  रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. तसे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना अटक करण्यासाठी विशेष  पथके रवाना केली आहेत.

दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे, हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून सुपारीची रक्कम ६ लाख २० हजार रूपये जप्त केली आहे. ही सुपारीची रक्कम बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असेही पाटील यांनी सांगितले. आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

आधीची तारीख चुकली

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा जरे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. सुरुवातीला त्यासाठी २४ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, २४ नोव्हेंबरला आरोपींचा डाव फसला. प्राथमिक तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात तांत्रिक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्या आधारे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मात्र  हा तपास करताना जरे यांच्या मुलाने गाडीमधून आरोपीचा काढलेला फोटो तपासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरला आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली होती .  दरम्यान, गाडीला कट मारल्याचा कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे आता प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

आरोपींची नावे : १) पत्रकार बाळ ज. बोठे ( रा. बालिकाश्रम रोड, नगर) : मुख्य सूत्रधार, फरार , २) सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर, केडगाव, नगर), ३) फिरोज राजू शेख (रा. राहुरी, नगर) , ४) ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर, नगर), ५) आदित्य सुधाकर चोळके (रा.कोल्हार, ता. राहाता, नगर), ६) ऋषिकेश वसंत पवार (रा. प्रवरानगर, राहाता)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!